आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गौरव: देशासाठी खाटीक समाजाचे योगदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- "देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतच नव्हे, तर विकासातही खाटीक समाजाचे मोठे योगदान आहे. खाटीक समाजातील प्रत्येक व्यक्तींनी आपला हा गौरवशाली इतिहास जाणून घेणे आणि त्याचप्रमाणे पुढेही कार्य करत राहणे गरजेचे आहे', असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय प्रवक्ता तथा माजी खासदार डॉ. विजय सोनकर यांनी केले. येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (पीडीकेव्ही) दीक्षांत सभागृहात सतूर सेनेच्या वतीने शनिवार, २३ मे राेजी झालेल्या हिंदू खाटीक समाज संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी खासदार शिवाजीराव कांबळे होते. सतूर सेनेचे संस्थापक संजय धनाडे, शिवप्रसाद घोडके, सतूर सेनेचे महासचिव जी. एम. पारधी, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, जिल्हाध्यक्ष श्याम विल्हेकर, प्रगती सदाफळे, शिवाजीराव पवार, अमोल विल्हेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सोनकर म्हणाले की, देशात खाटीक समाजाच्या एकूण हजार ८७१ जाती आहेत. उत्तर आणि मध्य भारतातील खाटीक समाज अनुसूचित जातीत आहे. मात्र, पूर्व आणि दक्षिण भारतातील समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश नाही. त्यामुळे त्या भागातील समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकचळवळ उभी करावी लागणार आहे. खाटीक समाजातील प्रत्येक जातीतील व्यक्तीचा डीएनए सारखा आहे. त्यामुळे समाजाचे रीतीरिवाज आणि संघटनाही एकच असायला हवी.
आपल्या समाजाने संघटित होऊन स्वत:चा विकास केला, तरीही देशाच्या विकासाला हातभार लागणार आहे. वरच्या जातीतील व्यक्तींना समस्यांना सामोरे जावे लागत नाही. दलित, शोषित, पीडित या जातीतीलच व्यक्तींना समस्या येतात. त्यामुळे आपला विकास करण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ घ्या.
स्वच्छता, बेटी बचाओ बेटी पढाओ, शिक्षण यांसारखे अभियान कृतीत उतरवा, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, इतर मान्यवरांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय धनाडे यांनी केले. मंगेश माकोडे यांनी सूत्रसंचालन केले. संदीप माकोडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी प्रकाशराव ठोकणे, बाबाराव हिवराळे, भागवत पवार, विनोद सदाफळे, बबनराव दुरवे, गोपाळराव कंटाळे, कविता ढोके, बालाजी सौदागर, संतोष पवार यांच्यासह इतरांनी पुढाकार घेतला.
समाजातील गुणवंतांचा करण्यात आला सत्कार
विविधक्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रा. जितेंद्र भाऊराव दुर्गे, रिना विष्णुपंत माकोडे, प्रगती विनोद सदाफळे यांचा समावेश आहे.
गोपाळराव कांबळेंना मरणोत्तर समाजभूषण
हिंदूखाटीक समाज संमेलनामध्ये प्रसिद्ध रेखाचित्रकार स्व. गोपाळराव कांबळे यांना मरणोत्तर समाजभूषण पुरस्कार प्रदान केला गेला. त्यांचे नातू शिवप्रसाद घोडके यांनी मान्यवरांच्या हस्ते तो स्वीकारला.
बातम्या आणखी आहेत...