आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यवर्ती बसस्थानकावरील हिरकणी कक्ष बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शासनाने स्तनदा मातांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक बसस्थानकावर हिरकणी कक्ष सुरू केला आहे. मात्र, येथील मध्यवर्ती बसस्थानकावरील हिरकणी कक्ष बंद राहत असल्यामुळे स्तनदा मातांची गैरसोय होत आहे. येथे काही महिन्यांपूर्वी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली. या कक्षाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटनही झाले. स्वतंत्र चौकीदाराचीही या ठिकाणी देखरेखीसाठी नियुक्ती केली होती. या कक्षात पंखा, खुर्ची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सर्व काही सुरुवातीच्या काळात दिसत होते. मात्र, अल्पावधीतच हे चित्र पालटले. या हिरकणी कक्षाकडे प्रशासनाने पाठ फिरवली. हिरकणी कक्षाची आज दुरवस्था झाली आहे. कक्षाच्या आत भिंतीवर जाळे निर्माण झाले असून, येथे कचरा व धूळ साचली आहे. हिरकणी कक्षाला नेहमी कुलूप दिसते, तर चौकीदारही गायब झालेला दिसतो. शिवाय हिरकणी कक्ष उपलब्ध आहे, स्तनदा मातांनी याचा लाभ घ्यावा, असा जनजागृती करणारा फलक लावलेला दिसून येत नाही. त्यामुळे स्तनदा मातांना याचा लाभ घेता येत नाही.

कक्ष सुरू असतो
बसस्थानकावरील हिरकणी कक्षाची देखरेख स्वतंत्र कर्मचार्‍याकडे दिली आहे. हिरकणी कक्षाच्या ओट्यावर एका व्यक्तीचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यामुळे तो कक्ष आम्ही बंद ठेवतो. माता असल्यास उघडला जातो. ए. एम. शेंडे, आगार व्यवस्थापक.

देखरेख नाही
शासनाने सुविधा तर उपलब्ध करून दिली. पण, त्याची देखरेख व्यवस्थित ठेवली जात नाही. त्यामुळे अशाप्रकारचे उपक्रम निकामी ठरत आहेत. स्वाती झामरे, बाळाची आई.