आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुगार खेळणे भोवले; अकोला महापालिकेचे सहा कर्मचारी निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- महापालिका पूर्व झोन कार्यालय परिसरात जुगार खेळणार्‍या सहा कर्मचार्‍यांना आयुक्त दीपक चौधरी यांनी सोमवारी निलंबित केले. निलंबित कर्मचार्‍यांमध्ये सहायक कर अधीक्षक संतोष नायडू, नंदकिशोर उजवणे, लिपिक राजेश सांळुखे, दीपक महल्ले, र्शीकृष्ण कडू, जितेंद्र रणपिसे यांचा समावेश आहे.

महापालिका आवारात जुगार खेळणे हा सर्व प्रकार गैर असून, यामुळे महापालिकेची नाहक बदनामी झाली. त्यामुळे चौकशीअंती त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती आयुक्त दीपक चौधरी यांनी दिली. शासकीय कार्यालयाचा गैरकायदेशीरपणे वापर करणे, महापालिकेची बदनामी करणे, गैरवर्तणूक करणे अशा स्वरूपाचा ठपका या सहा कर्मचार्‍यांवर ठेवण्यात आला आहे. रविवारी महापालिका कार्यालयात थेट जुगार खेळताना रंगेहात पकडल्याने त्यांच्यावर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे महापालिका कर्मचार्‍यांमध्ये चांगलीच खळबळ माजली होती. या पुढे अशा प्रकारचा गैरप्रकार होऊ नये याची दक्षता सर्व विभाग प्रमुखांनी घ्यावी, असा आदेश आयुक्तांनी दिला आहे. दरम्यान, जुगार खेळताना महापालिका मालमत्ता कर विभागातील रोकड वापरल्या गेल्याची चर्चा महापालिका परिसरात होती. यासंबंधी चौकशी करण्यात येईल आणि तसे आढळल्यास कठोर कारवाई करू, असे उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाने यांनी स्पष्ट केले.