आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा रुपयांसाठी जीव धोक्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून शहरातून होणार्‍या अवैध वाहतुकीला वेग आला आहे. प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणारी ही समस्या दिवसेंदिवस उग्ररूप धारण करीत आहे. प्रवासी केवळ सहा रुपये आणि थोडा वेळ वाचण्यासाठी अवैध वाहतुकीकडे वळत आहेत.

शहरातून पातूर, बाळापूर, बार्शिटाकळी, अकोट, निंबाकडे काळी-पिवळी जीप धावतात. या जीपमधून मोठय़ा प्रमाणात प्रवाशांची वाहतूक केली जाते. मात्र, ही वाहतूक अत्यंत धोकादायक असते. अनेक जीपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करण्यात येते. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटू शकते. परिणामी अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलिसांनी या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी होत आहे.

अवैध वाहतुकीची ठिकाणे
शहरात अनेक ठिकाणांहून अवैध प्रवासी वाहतूक होते. शहरातील प्रमिलाताई ओक हॉलजवळ, रतनलाल प्लॉट चौक, वाशिम बायपास, स्टेशनरोड, अकोटरोड, दक्षतानगर स्टॉप या ठिकाणांहून अवैध प्रवासी वाहतूक सुरू असते.

रस्त्याच्या कडेलाच अधिकृत स्टँड
काळी-पिवळी जीपसाठी शहरात जेलजवळ, वाशिम स्टँड आणि दत्त मंदिराजवळ हे अधिकृत स्टँड असल्याचा दावा, जीप-मेटॅडोर असोसिएशनने केला आहे. मात्र, हे स्टँड रस्त्याच्या अगदी कडेला असल्याने या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते.

कारवाईच्या प्रमाणात वाढ
शहर वाहतूक शाखा अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारल्याचा दिखावा करते. त्यामुळेच ही अवैध प्रवासी वाहतूक ना पूर्णपणे रोखल्या जात आहे, ना कमी होत आहे.त्यामुळे अवैध वाहतुकला मोठय़ा प्रमाणावर बळ मिळत आहे. ही वाहतूक थांबविण्यासाठी चालकांवर कारवाई होणे आवश्यक आहे.