आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Illegal Work In Akola Municipal Corporation Office Police Action

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोला महापालिकेच्या कार्यालयात रंगला जुगार; कर अधीक्षकांसह सात अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- मनपाच्या शाळा क्रमांक 15 मध्ये थाटलेल्या पूर्व झोन कार्यालयात रंगलेल्या जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी रात्री 8 वाजता छापा टाकला. या छाप्यात दोन कर अधीक्षकांसह सात जणांना अटक करण्यात आली.

जठारपेठ परिसरात महापालिकेचे पूर्व झोन कर वसुली कार्यालय आहे. रविवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक डी.एन.फड, हेडकॉन्स्टेबल मनोहर मोहोड, शिवसिंग डाबेराव, र्शीकृष्ण गायकवाड, संदीप तवाडे यांनी झोन कार्यालयात छापा टाकला.

पूर्व झोन कार्यालयात पत्त्याचा डाव रंगला होता. पोलिसांनी सहायक कर अधीक्षक संतोष बाळकृष्ण नायडू (वय 43, रा. शास्त्रीनगर), सहायक कर अधीक्षक नंदकिशोर पुनसा उजवणे (वय 53, रा. मोरेश्वर कॉलनी), लिपिक राजेश ज्ञानदेव साळुंके (वय 30 रा. नायगाव), दीपक पांडुरंग महल्ले (वय 43, रा. कोठारी वाटिका क्र. 2), जितेंद्र रामभाऊ रणपिसे (वय 43, रा. माळीपुरा), र्शीकृष्ण श्यामराव कडू (वय 43 रा. लहान उमरी) आणि शेख फिरोज शेख गफ्फूर (वय 30, रा. गवळीपुरा) या सात जणांना अटक केली. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांकडून ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

नगरसेवक राहुल देशमुखला अटक
जुगारप्रकरणी पोलिस कारवाई करत असताना या कारवाईत नगरसेवक राहुल देशमुख यांनी अडथळा निर्माण करुन पोलिस उपनिरिक्षकांना धक्काबुक्की केली. त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली नगरसेवक राहुल देशमुखला रात्री 11 वाजता अटक करण्यात आली.

मनपा अधिकारी-कर्मचार्‍यांची धाव..
पूर्व झोन कार्यालयातील जुगारावर छापा पडल्याची वार्ता शहरात वार्‍यासारखी पसरली. त्यामुळे सहकार्‍यांना भेटण्यासाठी मनपाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी रामदासपेठ पोलिस ठाण्यात एकच गर्दी केली होती.

पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रोख 25 हजार 225 रुपये जप्त केले तसेच दोन मोटारसायकली, पाच मोबाइल फोन असा एकूण दोन लाख 78 हजार 225 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मनपा शाळेचे पावित्र्य भंगले
महापालिकेच्या शाळा क्रमांक 15च्या परिसरातच झोन कार्यालय थाटण्यात आले आहे. यातच जुगाराचा खेळ रंगला होता. सकाळी शाळा, दिवसभर कामकाज आणि रात्री जुगार, असा जागेचा उपयोग करण्यात येतो.

पूर्व झोन कार्यालयात दर रविवारी जुगार रंगत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी आणखी नेमकेपणाने माहिती घेत सापळा रचला. माहिती ‘लीक’ न होण्याची काळजी घेतली आणि त्यानंतर रविवारी रात्री 8 वाजता छापा टाकला. यावेळी कोणी पळून जावू, नये यासाठी पोलिसांनी काळजी घेतली.