मूर्तिजापूर - येथील रेल्वेस्थानकावरून रविवारी सकाळी 9.13 वाजता सुटलेल्या शालिमार एक्स्प्रेसच्या (क्र. 18029) ट्राली फ्रेमला तडा गेल्याचे तंत्रज्ञ विजय नाईक यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी तत्काळ वरिष्ठांना कळवले. त्यानंतर स्थानकापासून पाच किलोमीटर पुढे गेलेली गाडी परत उलट दिशेने स्थानकावर आली. परिणामी, प्रवाशांमध्ये घबराहट निर्माण झाली होती. मात्र, नाईक यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. परिणामी, असंख्य प्रवाशांचे प्राण वाचले.
तंत्रज्ञ नाईक हे या गाडीने बडनेरा येथे एका इंजीन दुरुस्तीसाठी जात होते. मूर्तिजापूर स्थानकातील प्लॅट फार्म क्रमांक 2 वरून गाडी सुटली. दरम्यान, ‘एस-1’ या डब्ब्यात चढत असताना तंत्रज्ञ नाईक यांना ट्रॉली फ्रेमच्या पट्टय़ाला तडा गेल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी तत्काळ सहायक स्टेशन मास्टर एस. व्ही. सबनीस यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. क्षतिग्रस्त डब्बा वेगळा करण्यात आला.
काय असते ट्रॉली फ्रेम?
रेल्वे रुळावर धावणार्या रेल्वेच्या चाकावर गाडीचा तोल सांभाळणारी पट्टी असते. रेल्वेच्या भाषेत त्यालाच ट्रॉली फ्रेम असे म्हणतात. ती पूर्णत: तुटल्यास गाडीचा डब्बा खाली बसतो.