आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Railway News In Marathi, Railway Travelling, Summer, Divya Marathi

रेल्वे प्रवास ‘वेटिंग’वर!,गाड्यांचे आरक्षण फुल्ल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - उन्हाळी सुट्या आणि लग्नसराईमुळे रेल्वे प्रवाशांची संख्या दुप्पट-तिप्पट झाली आहे. त्यामुळे येत्या अडीच महिन्यांपर्यंतचे आरक्षण प्रतीक्षा यादीत असल्याचे चित्र आहे. परिणामी, आरक्षण मिळत नसल्याने अनेकांना आपला सहलीचा बेत रद्द करावा लागणार आहे.


अमरावती, वाशीम, बुलडाणा आणि हिंगोली या जिल्ह्यांतील बहुतांश रेल्वे प्रवासी लांबचा प्रवास करण्यासाठी अकोला येथीलच रेल्वेस्थानकापासून तिकीट आरक्षित करतात. पण, एप्रिल, मे आणि जून या अडीच महिन्यांत सर्वच सुपरफास्ट गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे आरक्षण पक्के करण्यासाठी 100 ते 150 पेक्षासुद्धा अधिक क्रमांकाची प्रतीक्षा करावी लागत आहे. तिकीट आरक्षण करण्यासाठी अकोला येथील रेल्वेस्थानकावरील आरक्षण खिडकीसमोर रोजच लांबच लांब रांग लागत आहे. दरम्यान, दीड ते दोन तास रांगेत उभे राहूनसुद्धा पक्के आरक्षण मिळत नसल्याने प्रवासी वैतागून जात आहेत. रेल्वेच्या संकेतस्थळाद्वारे आरक्षण करणार्‍यांनासुद्धा आरक्षणाची प्रतीक्षाच करावी लागत आहे.


तिकिटांची ही स्थिती सगळीकडेच
रेल्वेच्या आरक्षणाची प्रतीक्षा अकोलावासीयांनाच करावी लागत नाही, तर ही स्थिती राज्यात सर्वत्र आहे. दरवर्षी उन्हाळ्यात रेल्वेच्या प्रवाशांत लक्षणीय वाढ होते. उन्हाळी सुट्यांना मुलांना सहल घडवण्यासाठी अनेक कुटुंबातील सर्वच्या सर्व व्यक्ती रेल्वेचे आरक्षण करून ठेवतात, तर लग्न सोहळ्यात सहभागी होणारे वर्‍हाडी, पाहुणे यांचेही एकाच वेळी एकाच गावाला जाण्यासाठी आरक्षण केले जाते. याचा फटका नेहमी प्रवास करणार्‍यांना सहन करावा लागतो.


वातानुकूलित’साठी कमी प्रतीक्षा
वर्ग दोन आणि शयन कक्षाचे आरक्षणापेक्षा वातानुकूलित डब्यातून वर्ग एकाचा प्रवास करणार्‍यांना आरक्षण मिळवण्यासाठी कमी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे. वातानुकूलित डब्यातून उच्चवर्गीयच प्रवासी प्रवास करतात आणि त्याचे प्रवास भाडेसुद्धा अधिक आहे. त्यामुळे इतर डब्यांच्या तुलनेत प्रवासी कमी आहेत.

तिकिटांचा काळा बाजार रोखणार कसा
अकोला रेल्वेस्थानकावर काही दलालांचा कायम वावर असतो. दरवर्षीच उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्यांत त्यांच्याकडून तिकिटांचा काळा बाजार केला जातो. सुट्यांच्या पूर्वीच दलाल तिकीट आरक्षित करून घेतात आणि प्रवाशांना ते दुप्पट ते तिप्पट रकमेने विकतात.

‘तत्काळ’सुद्धा प्रतीक्षेत
बहुतांश गाड्यांमधील तत्काळचे आरक्षणसुद्धा वेटिंगवरच आहे. परिणामी, आपली जागा पक्की करण्यासाठी प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

कडक कारवाई करू
प्रवाशांना दलालांचा त्रास होऊ नये, याकडे लक्ष ठेवतो. आरक्षण रांगेत संशयित आढळल्यास त्याची चौकशी करुन त्याविरुद्ध कारवाई केली जाते. रेल्वेस्थानकाला दलालमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’’ - बी. पी. गुजर, रेल्वे स्टेशन व्यवस्थापक.