आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाभार्थ्यांच्या घरकुलावर धनदांडग्यांनी केला ताबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - अल्पसंख्याक मागासवर्गीय लाभार्थ्यांना हक्काचे छत मिळावे, यासाठी शासनाने अल्पसंख्याक घरकुल योजना ,इंदिरा आवास योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत देऊळघाट येथे चार लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होऊन त्याचे बांधकाम सुद्धा करण्यात आले आहेत. परंतु गावातील तंटामुक्त अध्यक्षासह काही धनदांडग्यांनी या घरकुलाची शंभर रुपयाच्या बंधपत्रावर खरेदी विक्रीचे व्यवहार करून लाभार्थ्यांच्या घरकुलावर कब्जा केला आहे. त्यामुळे या घरकुल भ्रष्टाचाराची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जुनेदखॉ फकरूल्लाखान यांनी एका निवेदनाव्दारे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

देऊळघाट येथील चार लाभार्थ्यांना अल्पसंख्याक घरकुल योजना इंदिरा आवास योजनेतंर्गत घरकुल मंजूर करून त्याचे बांधकाम सुद्धा करण्यात आले आहे. परंतु शाखा अभियंता विस्तार अधिकाऱ्यांनी नमुना आठ ‘अ’ प्रमाणे लाभार्थ्यांच्या जागेची खात्री करता तसेच स्थळ नकाशा मंजूर करता घरकुलाचे बांधकाम पूर्ण करून घेतले आहे. यावरही कळस म्हणजे घरकुल लाभार्थी अशोक धोंडू मोरे हे वॉर्ड क्रमांक सहा मध्ये राहत असताना त्यांच्या घरकुलाचे बांधकाम अ. रऊफ अ. रज्जाक यांच्या जागेवर करण्यात आले आहे. सध्या या घरकुलामध्ये अ. रऊफ हे राहात आहेत. तर जोहराबी शेख दाऊद या वॉर्ड क्रमांक चार मध्ये राहात असून त्यांच्या घरकुलाचे बांधकाम वॉर्ड क्रमांक सहा मध्ये करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जोहराबी यांच्या मालकीचा वॉर्ड क्रमांक सहा मध्ये कोणताही भूखंड नसताना तो दाखविण्यात आला आहे. भीमराव गुलाबराव गवई हे वॉर्ड नंबर सहा मध्ये राहात असून त्यांच्या घरकुलाचे बांधकाम कुरेशी मोहल्ला वॉर्ड क्रमांक तीनमध्ये करण्यात आले आहे. त्यांच्या घरकुलाचा लाभ शेख यासीन शेख कालू कुरेशी घेत आहेत. तर लाभार्थी भीमराव गवई हे आज रोजी वॉर्ड नंबर सहामध्येच राहात आहेत. तसेच रमेश बाबुराव जाधव हे वॉर्ड क्रमांक पाच मध्ये राहात असून त्यांच्या घरकुलाचे बांधकाम वॉर्ड क्रमांक तीन मध्ये करण्यात आले आहे. सद्यास्थितीत त्यांच्या घरकुलाचा लाभ अ. सईद अ. मजीद हे घेत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.