आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण सक्तीचे नव्हे, तर आवडीचे असावे, प्रा. इंदुमती काटदरे यांनी मांडले विचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- वयाच्याअडीच वर्षांपासून मुलांवर शाळेचे ओझे लादले जात आहेत. वयाच्या पाच वर्षांपर्यंत मुलांचा खरा विकास हा घरीच होत असतो. खरे तर त्यांना या काळात आईने संस्कार करायचे असतात, शिष्टाचार शिकवायचे असतात. पण, अतिरेकी हव्यासापोटी आपण त्यांना स्पर्धेत धावण्यासाठी भाग पाडतो. त्यांची इच्छा, आवड यांचा विचार केला जात नाही. कोणतेही शिक्षण हे सक्तीचे नव्हे, तर आवडीची गोष्ट आहे, असे प्रतिपादन अहमदाबाद येथील शिक्षणतज्ज्ञ प्रा. इंदुमती काटदरे यांनी केले. प्रमिलाताई ओक सभागृहात सुरू असलेल्या नवरात्र व्याख्यानमालेत त्यांनी सोमवार, ऑक्टोबर रोजी तृतीय पुष्प गुंफले.
बाबूजी देशमुख वाचनालयातर्फे दरवर्षी नवरात्र व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. आज तिसऱ्या दिवशी प्रा. इंदुमती काटदरे यांनी ‘शिक्षण आणि कुटुंब’ याविषयी मार्गदर्शन केले. ग्राहक मागेल तसा माल विक्रेत्याने द्यावा, या पद्धतीप्रमाणे आज शिक्षण व्यवस्थेचे झाले आहे. पालकांना हवे तसे शिक्षण देण्याचे काम शिक्षण संस्था करत असल्याने ते एक प्रकारचे दुकान झाले आहे. मुलांचे जडण-घडण घरी, कुटुंबात झाले, तर तो खऱ्या अर्थाने समाजाचा घटक होऊ शकतो. आणि ते जर योग्य प्रकारे झाले नाही, तर त्यांच्यात मनोविकारांचे प्रमाण वाढते. आणि त्यातूनच आज मुलांमध्ये डिप्रेशनचे प्रमाण वाढत आहे.
समाज हे ज्ञानाचे स्रोत आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहारात उपयोगी पडेल, अशा शिक्षणाची आज गरज निर्माण झाली आहे. इंटरनेटवरून माहिती कॉपी करणे, प्रोजेक्ट तयार करणे आणि मार्क मिळवणे, असा प्रकार सध्या शालेय शिक्षण घेताना सुरू आहे. यातून ज्ञान मात्र कुठेच मिळत नाही. उत्तर दिशा कुठे अाहे, असे विचारल्यावर उत्तर दिशा ही वरती आहे, असे उत्तर त्यांच्याकडून मिळते. आज मुलांना नकाशातील उत्तर दिशा माहीत आहे. पण, उभे राहिल्यानंतर कुठे हे माहीत नाही. बीकॉम झालेल्या मुलांना एका किलोच्या किमतीवरून पाव किलो भाजीचा दर काढता येत नाही, असे चित्र पाहायला मिळते.
आज मुलांना जमिनीवरचं शिक्षण मिळतच नाही. त्यामुळे व्यवहारात कसे वागायचे असते, हेच त्यांना समजत नाही. पुस्तकातील ज्ञानाचा मात्र व्यवहारात उपयोग कसा करायचा, हेच त्यांना शिकवले नाही. मुलांजवळ आपली संस्कृती, शिष्टाचार शिकायला वेळच राहिला नाही. शिक्षित व्यक्तीने सज्जन असावे, हे समीकरण चुकले आहे. त्याचा परिणाम आजच्या शिक्षणपद्धतीमुळे जाणवतो, असे त्या म्हणाल्या. प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष महादेवराव भुईभार यांनी वक्त्यांचे स्वागत केले. प्रा. नीलेश पाकदुने यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराग मिश्र यांनी केले.सोमवारी आयोजित प्रा. इंदुमती काटदरे यांच्या व्याख्यानाला अकोलेकरांनी गर्दी केली.