आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औद्योगिक सुरक्षा सप्ताह; ‘शून्य अपघात’ उद्दिष्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- विविध कारणांमुळे लघू व मोठय़ा उद्योगाच्या ठिकाणी आग लागण्यासारख्या घटना घडत आहेत. त्यामुळे 4 मार्चपासून सुरू झालेल्या औद्योगिक सुरक्षा सप्ताहांतर्गत ‘शून्य अपघात’ हेच उद्दिष्ट समोर ठेवून जनजागृतीपर उपक्रम राबवण्यावर भर दिला जात असल्याची माहिती औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक संचालक धीरज खिरोडकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
सर्वत्र औद्योगिक सुरक्षा सप्ताह 4 मार्चपासून साजरा करण्यात येत आहे. दिवसेंदिवस सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर येत आहे. बर्‍याच ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी, नियोजनबद्ध सुरक्षा यंत्रणेचा अभाव आहे. त्यामुळे अकोला क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणार्‍या अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या चार जिल्ह्यांमध्ये लघू व मोठे व्यावसायिकांना सुरक्षेबाबत माहिती देण्याच्या दृष्टीने जनजागृतीला सुरुवात झाली आहे. अमरावती विभागातील 2,750 औद्योगिक वसाहतीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याबाबत इंडस्ट्रिजच्या मालकांना आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत अपघात घडणार नाही याची दक्षता घेण्यासोबतच आवश्यक ती साधनसामग्री ठेवण्याबाबत सांगितले जाते. तरीसुद्धा बर्‍याच उद्योगांच्या ठिकाणी सुरक्षेची साधने ठेवण्याकडे दुर्लक्ष केले जाते. कोणताही उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कारखाने अधिनियम 1948 व महाराष्ट्र कारखाने नियम 1963 सुरक्षा, आरोग्य कलमांचे पालन करणे बंधनकारक असते. प्रभारी सहसंचालक ए. बी. कांबळे यांच्या मार्गदर्शनात आणि आरोग्य विभाग क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक संचालक व्ही. डब्ल्यू. निकोले यांच्या सहकार्याने या सप्ताहात कामगारांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, परिसंवाद, पथनाट्याच्या माध्यमातून त्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्‍न करणार आहोत, अशी माहिती खिरोडकर यांनी दिली.
काय करायला हवे
कोणत्याही आपत्ती उद्भवल्यास घाबरून न जाता संयमाने परिस्थिती हाताळावी. तत्काळ अग्निशमन विभाग, पोलिस तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती द्यावी.