आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

9 टक्के विकास दर शक्य- आनंद राठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-मागील पाच वर्षांत देशात उघड झालेले घोटाळे, महागाई नियंत्रणात आणण्यात सरकारला आलेले अपयश यामुळे नवीन प्रकल्प मार्गी लागले नाहीत. आर्थिक सुधारणांची गती मंदावली. त्यामुळे जीडीपी (सकल घरेलू उत्पादन) 8.5 टक्क्यांहून 4.5 टक्क्यांवर घसरला. 2000-2008 दरम्यान असलेला महागाईचा दर 4.5 टक्क्यांहून 10 टक्के झाला. वित्तीय तूट 3.5 वरून 5.5 पर्यंत पोहोचली. देशाची अर्थव्यवस्था त्यामुळे दिशाहीन झाली. परंतु, आता मोदी यांच्या नेतृत्वात सक्षम सरकार केंद्रात आले असून, येणार्‍या पाच वर्षांत बिघडलेली व्यवस्था ठीक होईल, असा अंदाज दिसू लागला आहे. देशाची पावले योग्य दिशेने पडत असल्याचे द्योतक आहे, असा विश्वास बाँम्बे स्टॉक एक्स्चेंजचे माजी अध्यक्ष आनंद राठी यांनी व्यक्त केला. विदर्भ चेंबर ऑफ कॉर्मस अँड इंडस्ट्रीच्या वतीने प्रमिलाताई ओक सभागृहात शनिवार, 21 जून रोजी सायंकाळी ‘भविष्यातील भारतीय अर्थव्यवस्था’ या विषयावर ते बोलत होते. रिलायन्स कॅपिटलचे गुंतवणूक विशेषज्ञ मधुसूदन केला, चेंबरचे अध्यक्ष कमलेश वोरा, माजी अध्यक्ष अशोक डालमिया व्यासपीठावर होते. चेंबरचे संस्थापक कै. ब्रिजलालजी बियाणी यांच्या स्मरणाने व्याख्यानाचा शुभारंभ झाला.
आनंद राठी म्हणाले की, देशांतर्गत अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी सरकारने प्रत्येक गोष्टीत मदत केली पाहिजे. सरकार अकार्यक्षम ठरले तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. वस्तूंचा उपभोग वाढला आणि गुंतवणूक कमी झाली तर अर्थव्यवस्था लंगडी होते.मधुसूदन केला म्हणाले की, अर्थव्यवस्थेचा परिणाम शेअर बाजारावर होत असतो. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करताना अकोलासारख्या शहरातील गुंतवणूकदारही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अप्रत्यक्षपणे त्यांचेही योगदान राहू शकते, यादृष्टीने येथेही विचार व्हावा, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
शेअर बाजाराचा विषय निघाला की, प्रत्येकाला झटपट करोडपती व्हावेसे वाटते. मात्र, भविष्याच्या गुंतवणुकीचा विचार केला तर त्यासाठी संयम ठेवावाच लागतो आणि जो संयम ठेवतो त्याला फायदेही मिळतात.
गुंतवणूक म्हणून सोने खरेदी, रिअल इस्टेटमधील गुंतवणूक, एलआयसी हे पर्याय असतात. शेअरमध्ये गुंतवणूक केली की, गुंतवणूकदाराचा दृष्टिकोन बदलून जातो. बाजारात तेजी असली तर ठीक, परंतु मंदी आली की, विचारांची दिशा बदलते. याबाबत गुंतवणूकदारांनी सावध राहावे, असा इशारा देताना केला म्हणाले, जे अपरिपक्व असतात ते फायद्याचा विचार करतात, तर जे व्यावसायिक असतात ते नुकसान गृहीत धरून चालतात.
ट्रेडिंगविषयी बोलताना केला म्हणाले, 100 रुपयांचा शेअर 90 रु. झाला, तर तो विकण्याचा विचार करावा, परंतु तोच जर 40 रुपयांवर आला तर त्याबाबत विचार केला पाहिजे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यामुळे देशासाठी कितपत फायदेशीर राहील, ही चर्चा सुरू झाली आहे. धीरुभाई अंबानी यांच्यामुळे रिलायन्स झाले. तसाच लाभ मोदी यांच्यामुळे होण्याची शक्यता आहे, असेही केला यांनी सांगितले.

सुरुवातील कमलेश वोरा यांनी स्वागतपर भाषण केले. प्रास्ताविक अशोक डालमिया यांनी केले. वक्त्यांचा परिचय रमाकांत खंडेलवाल, निकेश गुप्ता यांनी करून दिला. संचालन विजय पनपालिया यांनी केले.