आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळाचे लिंग बदलण्याचा दावा, ‘इंजेक्शन बाबा’ला अटक; कुटीत सापडल्या सेक्सवर्धक गोळ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा - गर्भातील बाळाचे लिंग बदलून देतो, निपुत्रिकांना पुत्रप्राप्तीसह मृत व्यक्तीस जिवंत करण्याची शक्ती आपल्यात असल्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक करणार्‍या राजूर येथील एका बाबाचा पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी भंडाफोड केला आहे. सोमवारी रात्री एका स्टिंग ऑपरेशनद्वारे या ‘इंजेक्शन बाबा’च्या मुसक्या आवळण्यात आल्या.

दरम्यान, कथित डॉक्टर तथा स्वामी पारस नंदगिरी महाराज उर्फ इंजेक्शन बाबा व त्यांचा सहकारी संजय बेदरकर यांना पोलिसांनी अटक केली असून मोताळा न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या दहा किमी अंतरावर असलेल्या रामेश्वर मंदीर परिसरात गेल्या काही महिन्यापासून इंजेक्शनवाले बाबाने बस्तान बसवले होते. अंनिसचे कार्यकर्ते रणजित राजपूत व वैशाली इंगळे या दोघांनी बाबाची भेट घेऊन मूल होण्यासाठी उपाय सांगण्याची गळ बाबाला सोमवारी दुपारी घातली.
त्यावर 500 रुपये घेऊन रात्री दहाच्या सुमारास पोहोचण्याचा सल्ला त्यांना देत अपत्यप्राप्तीची बाबाने खात्री दिली होती. बनावट रुग्ण बनून हे दोघेही रात्री बाबाच्या दरबारात पोहोचले. बाबाने इशारा करून रणजित राजपूत व वैशाली इंगळे यांना बाबाच्या झोपडीजवळ पाठवले. त्यांच्याकडून 500 रुपये घेऊन पती बनून गेलेल्या रणजितला तेथून जाण्यास सांगत वैशालीला तेथेच थांबवून घेतले.

पूर्व नियोजनाप्रमाणे पोलिसांना मोबाईलवरून संकेत दिल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी समीर शेख व बोराखेडी पोलिस व बुलडाण्याचे ठाणेदार एन. पी. तांदळे यांनी आश्रमावर छापा टाकून त्यास ताब्यात घेतले. अंनिसचे प्रा. राम बारोटे, नरेंद्र लांजेवार, संतोष राजपूत यांच्या उपस्थितीत पोलिस प्रशासनासोबत चर्चा करून हे स्टींग करण्यात आले होते.