आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गव्हाणी घुबड, शिक्रा पक्षी मांज्याने झाले जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - इंडियन बर्डमॅन डॉ. सलीम अली यांची १२ नोव्हेंबरला जयंती साजरी होत असताना चायना मांजामुळे दोन पक्षी जखमी झाल्याची घटना घडली. एका घटनेत गव्हाणी घुबड, तर दुसऱ्या ठिकाणी शिक्रा हा पक्षी जखमी अवस्थेत आढळला. पक्ष्यांसाठी घातक ठरणाऱ्या चायना मांज्यावर कायमस्वरूपी बंदी घालणे गरजेचे असल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले.

मकरसंक्रांतीला पतंगबाजीसाठी चायना मांजाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. जानेवारीतील पतंगबाजीदरम्यान विजेचे खांब, वृक्ष, इमारती आदी ठिकाणी पतंग अडकून पडतात. कालांतराने पतंग नष्ट होते, इतर धागेही नष्ट होतात. मात्र, चायना मांजा नष्ट होत नाही. मग अशा मांज्यात पक्षी अडकून जखमी होतात, प्रसंगी प्राणही गमावतात. अशाच दोन घटना आज पक्षी दिनाला उजेडात आल्या. शहरातील खोलेश्वर भागात राजू रामन्ना भारती यांच्या घरावर चायना मांजाने जखमी झालेला शिक्रा हा शिकारी पक्षी पडला. त्यांनी वनविभाग सर्पमित्र शेख मुन्ना यांच्याशी संपर्क करून माहिती दिली. त्यानंतर सदर पक्षी ताब्यात घेण्यात आला. चायना मांजाने त्याचा एक पाय पूर्णपणे कापला असून, त्याला भविष्यात शिकार करणे, जगणे कठीण होणार आहे, तर दुसऱ्या घटनेत महान परिसरात गव्हाणी घुबड जखमी अवस्थेत राहुल दिघे यांना आढळले. त्यांनी वनविभागाशी संपर्क करून ते त्यांच्या हवाली केले. गव्हाणी घुबडाचेही दोन्ही पाय चायना मांजाने जखमी केले असून, त्याला उभे राहणेही शक्य होत नाही. या दोन्ही पक्ष्यांवर उपचार करण्यात आले असले तरी त्यांना निसर्गात पुन्हा संघर्ष करत जगणे कठीण होणार आहे. पक्ष्यांसाठी घातक असलेला या चायना मांज्याची विक्री, वापर थांबवणे गरजेचे आहे.

शहरात चायना मांजामुळे दोन पक्षी जखमी झाले. वाहनचालकही बऱ्याचदा या मांजामुळे जखमी झाल्यच्या घटना घडल्या आहे.

मांजा काढण्यासाठी हवी मोहीम
निसर्गसंवर्धनासाठी कार्य करणाऱ्या अनेकविध स्वयंसेवी संस्था शहरात आहेत. त्यांनी संक्रांतीनंतर विजेचे खांब, इमारती, वृक्षवेलींवर अडकलेल्या पतंगी, चायना मांजा काढण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची गरज आहे. असे घडल्यास अनेक पक्ष्यांना जीवदान मिळेल, असा सूर उमटत आहे.