आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International Events,Latest New In Divya Marathi

विद्यार्थी अनुभवणार सिंगापूरमध्ये ‘इंग्लिश विंग्लिश’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- परदेशात इंग्रजी शिकणार्‍या श्रीदेवीवर चित्रीत झालेला ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटाचा अनुभव अकोल्यातील विद्यार्थी घेणार आहे. ‘सिनर्जी-अँन इंटरनॅशनल इव्हेंट ऑफ अस्पायर’ याअंतर्गत विद्यार्थी सिंगापूरमध्ये तीन दिवस तेथील संस्कृती, शिक्षण प्रणाली, भाषेचा अभ्यास करणार आहे. अध्ययनासाठीची त्यांची ही विदेश वारी म्हणजे एक प्रकारे विद्यार्थ्यांचा ‘इंग्लिश विंग्लिश’चा अनुभव आहे.
अस्पायर इन्स्टिट्यूटतर्फे नेण्यात येणार्‍या या परदेश दौर्‍याचे हे द्वितीय वर्ष आहे. शिक्षणाच्या कक्षा रुंदाव्यात, भाषेविषयीची गोडी निर्माण व्हावी आणि विविध ठिकाणांची भाषाशैली अवगत करता यावी, यासाठी हा दौरा घेण्यात येत आहे. सिंगापूरमध्ये विविध देशांतील लोक इंग्लिश शिकायला येतात. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या देशातील भाषाशैलीचा अभ्यासदेखील करता येतो. पाच दिवसांच्या या दौर्‍यातील दोन दिवस प्रवासात जाणार असले, तरी त्यांना या वेळी मॅनेजमेंटसारख्या इतर गोष्टींची माहिती देण्यात येईल. सिंगापूरमध्ये तीन दिवस रोज विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. पहिल्या दिवशी शहरातून फेरफटका मारताना तेथील लोकांसोबत संवाद साधणे हा मुख्य उद्देश आहे. यातून तेथील शब्दोच्चार पद्धत, एसेंट यांचा अभ्यास करता येईल. तेथील संस्कृती दर्शनासोबतच सायन्स पार्कला भेट देण्यात येणार आहे. म्हणजे तेथे भाषेसोबतच विज्ञानाचादेखील अभ्यास करण्यात येणार आहे.
दुसर्‍या दिवशी इंटरनॅशनल वर्कशॉप होणार आहे. या वर्कशॉपमध्ये अस्पायरचे संचालक सचिन बुरघाटे अनेक विषयांवर मार्गदर्शन करणार आहे. कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध शहरांतील विद्यार्थी, सिंगापूरचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तिसर्‍या दिवशी तेथील शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांना भेट देण्यात येईल. सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटी, अँसेन्ड दि इंग्लिश प्रोफेशनल्स या लँग्वेज स्कूलमध्ये विद्यार्थी लेक्चरमध्ये सहभागी होऊन तेथील शिक्षणपद्धती समजून घेणार आहे. यात दौर्‍यासाठी सिंगापूरमधील इन्स्टिट्यूट, शासनासोबत सर्व चर्चा झाली असून, लवकरच अकोल्यातील 20 विद्यार्थी परेदश वारीला जातील.

शिक्षणासाठी वयाची अट नसते, असे म्हटले जाते. तसेच या दौर्‍यासाठीदेखील वयाची र्मयादा नाही. फक्त भाषेच्या अभ्यासाची आवड असणारे विविध वयोगटांतील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यात शाळकरी विद्यार्थ्यांसह डॉक्टर, विविध क्षेत्रांत नोकरी करणारे, भाषा शिकणारे विद्यार्थी आहेत. त्यांच्यासोबत एक इव्हेंट समन्वयकदेखील असणार आहे.