आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेध विधानसभेचे- भाजपच्या उमेदवारीकरिता खामगावात नावांचीच चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव - खामगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपची उमेदवारी मिळवण्यामध्ये अँड. आकाश फुंडकर यांचे नाव सध्या अग्रक्रमावर आहे. तशी चर्चाही भाजपच्या गोटातून ऐकण्यास मिळत आहे. 3 ऑगस्टला खामगावसाठी भाजपतर्फे जवळपास सहा इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या. त्यानंतर खामगावमध्ये उमेदवारी कोणाला मिळणार, याविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत.

या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेले भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अँड. आकाश फुंडकर, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष डिडवाणी, बजरंगदलाचे विभागीय संयोजक अँड. अमोल अंधारे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय ठाकरे, प्रल्हाद बगाडे व माजी तालुकाध्यक्ष सारंगसिंह चव्हाण या सहा जणांनी बुलडाणा येथे पक्षनिरीक्षक आमदार गिरीश महाजन यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे. एवढेच नव्हे, तर आपणास उमेदवारी का द्यावी? याची कारणमीमांसापण पक्षनिरीक्षकांसमोर मांडल्या. या सर्व बाबी निरीक्षकांनी ऐकून घेतल्या आणि आपले मत पक्षर्शेष्ठींकडे पोहोचवणार असल्याचे सांगितले.

इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीची मागणी केल्यानंतर शहरात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्यात. कोणी म्हणत होते की, अँड. आकाश फुंडकरांना, कोणी म्हणत होते की, संतोष डिडवाणी यांना, तर कोणी अँड. अमोल अंधारे यांना उमेदवारी मिळणार. संजय ठाकरे, प्रल्हाद बगाडे व सारंगसिंग चव्हाण यांच्या नावाची फारशी चर्चा नाही.

4 ऑगस्टला सकाळपासूनच शहरात या चर्चा रंगत आहे. दिवसभर भाजपच्या उमेदवारीचा विषय चर्चेचा बनला होता. यामुळे नागरिकांचे मनोरंजन झालेले दिसून येत आहे. उमेदवारी जाहीर होईपर्यंत शहरात अनेक तर्कवितर्क वर्तवून त्याची चर्चा होणार आहे. अँड. आकाश फुंडकर यांनी मात्र गेल्या एक वर्षापासून जनसंपर्क वाढवला आहे, तर शहरातील वॉर्डा-वॉर्डात भाजयुमोच्या शाखा उघडल्या आहेत. यावरून त्यांची विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी पूर्वीपासून असल्याचे दिसून येते. एकंदरीत चित्र पाहता उमेदवारी जाहीर होईपर्यंत इच्छुकांच्या डोक्यावर टांगती तलवार राहणार आहे, एवढे मात्र निश्चित.
काँग्रेसकडून आमदार सानंदांची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमधील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तो तिढा सुटला तर खामगाव विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या वाट्याला येईल आणि या मतदारसंघाची उमेदवारी ही काँग्रेसचे विद्यमान आमदार दिलीपकुमार सानंदा यांना मिळेल. या मतदारसंघात काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा महिला काँग्रेस समितीच्या अध्यक्षा डॉ. तबस्सूम हुसेनसह अनेक जण इच्छुक आहेत. त्यांनीपण आपापल्यापरीने, छुप्यारीतीने काँग्रेसच्या तिकिटासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
भारिप-बमसंतर्फे या वेळीही अशोक सोनोने
भारिप-बमसंतर्फे भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनोने यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे. आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळणार हे गृहीत धरून त्यांनी एक वर्षापासून मतदारसंघात जनसंपर्क वाढवला आहे. शेतकरी व सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आंदोलनेही केली आहेत व करत आहेत. मनसेत मात्र कोणी सक्षम उमेदवार दिसून येत नाही. या पक्षाला या मतदारसंघात उमेदवार आयात करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.