आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमधील \'आयपीएल\'मुळे कार्यकर्ते त्रस्त ,सत्ता नसताना हाेती एकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- क्रिकेट खेळाडूंना कोट्यवधींची अर्थप्राप्ती करून देणाऱ्या आयपीएल मॅचेस संपुष्टात आल्या आहेत. मात्र, भाजपमधील अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाची आयपीएल अद्यापही संपुष्टात आलेली नाही. नेतेच वेगवेगळ्या टीममध्ये विभागले गेल्याने, प्रत्येक टीममध्ये आपला कुणीतरी राजकीय खेळाडू दिसत असल्याने आपण नेमक्या कोणत्या टीमचे समर्थन करावे? असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्ते तसेच नगरसेवकांसमोर निर्माण झाला आहे. कुरघोडीच्या या मॅचमध्ये अनलिमिटेड ओव्हर असल्याने शहराचा विकासही खुंटला आहे. त्यामुळे या लीगची फायनल मॅच खेळवून सर्व राजकीय खेळाडूंना एकाच टीममध्ये आणण्याचे साकडे काही सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी राज्यस्तरावरील वरिष्ठ नेत्यांना घातले असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यात १५ वर्ष तर महापालिकेत साडेसात वर्ष सत्तेबाहेर असताना भारतीय जनता पक्षाचे नेते तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक एकसंघ होते. खासदार, आमदार अथवा संघटनमंत्र्यांनी दिलेला निर्णय अंतिम मानला जात होता. मात्र, महापालिकेत तसेच राज्यात सत्ता आल्याबरोबर गटातटाची लागण भाजपमध्ये सुरू झाली. स्थानिक वरिष्ठ नेत्यांमध्येच चढाओढ निर्माण झाल्याने पदाधिकारी, नगरसेवक तसेच कार्यकर्तेही या गटातटात विभागले गेले. या गटातटाच्या राजकारणाचा फटका शहराच्या विकासकामांवर होत आहे. याचे भानही ठेवले जात नसल्याने निधी असताना कोट्यवधी रुपयांची विकासकामे रखडली आहेत. २७ मे रोजी स्थगित केलेली सभा महिना होत आला असताना अद्यापही बोलावण्यात आली नाही. ही सभा बोलावून विकासकामे मार्गी लावावीत, यासाठी कोणत्याही गटातील प्रमुख नेता पुढाकार घेताना दिसत नाही. ज्या मतदारांमुळे सत्ता मिळाली, त्या मतदारांकडेच दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे एकीकडे नगरसेवक वैतागले असताना आता प्रभागातील सर्वसामान्य कार्यकर्तेही त्रस्त झाले आहे. महापालिकेत सत्ता तसेच निधी असताना विकासकामे होत नसल्याचे दु:ख अाता कार्यकर्ते व्यक्त करात आहेत. ही व्यथाही कोणत्या नेत्याला सांगावी? असा पेचही या कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाला आहे. मते मागायला आले होते, आता विकासकाम कोण करणार? असा प्रश्न मतदार करतात. त्यामुळे महापालिका, विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत मतदारांशी साधलेला संवाद आता अंगलट येत आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी नाव छापण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे. त्यामुळे राजकीय कुरघोडीच्या आयपीएल मॅचची फायनल मॅच घेऊन हे गटातटाचे राजकारण बंद करा, असे साकडे काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांना घातले असल्याची माहिती मिळाली आहे.
बातम्या आणखी आहेत...