आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटन केंद्र, रेस्ट हाऊस डंप, महानच्या काटेपूर्णा प्रकल्पावरील गुंता लोकप्रतिनिधी सोडवणार का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शहरासाठी 15 वर्षांपूर्वी महान येथील काटेपूर्णा प्रकल्पावर बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर पर्यटन केंद्र सुरू करणा-या शगुनचा करारनामा 2010 मध्ये संपुष्टात आला. परंतु, अद्यापही कंपनीने जागा तसेच रेस्ट हाऊसचे हस्तांतरण केले नाही. कंपनीकडे पाटबंधारे विभागाचे 15 लाख 50 हजार रुपये थकले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून या प्रकरणाचे भिजत घोंगडे कायम आहे. तत्कालीन शासनाने या प्रकरणात काहीही केले नाही. जलसंपदा विभाग मुख्यमंत्र्यांकडे असल्याने जिल्ह्यातील आमदार हा गुंता सोडवण्यासाठी प्रयत्न करतात का? याकडे लक्ष लागले आहे.
बांधकाम विभागाप्रमाणेच पाटबंधारे विभागाचे रेस्ट हाऊस आहेत. परंतु, पाटबंधारे विभागाकडे असलेल्या रेस्ट हाऊसच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी येत नाही. परिणामी, देखभाल दुरुस्तीचा खर्च प्रकल्पाच्या खर्चात जोडला जातो. अकोला पाटबंधारेच्या अखत्यारीत महान येथील जिल्ह्यातील सर्वात मोठा काटेपूर्णा प्रकल्प आहे. या प्रकल्पालगत रेस्ट हाऊस आहेत, तर शहरातही रेस्ट हाऊस आहेत. रेस्ट हाऊसच्या देखभालीचा निधी मिळत नसल्याने तसेच अकोला शहरालगत एकही पर्यटन केंद्र नसल्याने सन २००० मध्ये काटेपूर्णा प्रकल्पावर पर्यटन केंद्र निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. काटेपूर्णा प्रकल्पालगत असलेले रेस्ट हाऊस तसेच प्रकल्पांतर्गत पर्यटनाची परवानगी देण्यात आली. या अनुषंगाने पाटबंधारे विभागाने निविदा बोलावल्या. नागपूरच्या मे. राजकुमार टुरिस्ट या कंपनीला दहा वर्षांच्या लीजवर देण्यात आली. टुरिस्ट कंपनीने तीन वर्ष पर्यटन केंद्र चालवल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अनुमतीने शगुन अॅरोस्पार्टला हे पर्यटन केंद्र मार्च २००३ ला हस्तांतरित केले. कंपनीसोबत झालेल्या करारनाम्यानुसार पहिल्या तीन वर्षांसाठी एक लाख २० हजार रुपये तसेच प्रवेश शुल्कावर १० टक्के, चौथ्या वर्षी एक लाख ३० हजार, तर उर्वरित वर्षांसाठी प्रत्येक वर्षी २० हजार रुपयाने वाढ तसेच प्रवेश शुल्कात दरवर्षी दहा टक्क्याने वाढ, असे निश्चित करण्यात आले होते. शगुनने काही वर्ष महसुलाचा भरणा केला. मात्र, पुढे पैशाचा भरणा केला नाही. त्यामुळे शगुनकडे १६ लाख ९० हजार रुपये थकले होते. यापैकी शगुनने चार लाख रुपयांचा भरणा केला. त्यामुळे १२ लाख ७० हजार रुपये थकीत राहिले. रक्कम थकीत असल्याने पाटबंधारे विभागाला जागाही हस्तांतरित करून घेता आली नाही, तर शगुनने नुकसान झाल्यामुळे थकीत रक्कम भरण्यास असमर्थता व्यक्त केली. परिणामी, पाटबंधारे विभागाने या थकीत रकमेवर १८ टक्के व्याज आकारल्यामुळे ही रक्कम आता १६ लाख ५० हजार रुपये झाली आहे. शगुन थकीत रक्कम भरण्यास तयार नाही, तर पाटबंधारे विभाग रेस्ट हाऊस ताब्यात घेण्यात असमर्थ आहे. दहावर्षांपासून झाले भकास : पर्यटनकेंद्र २००४-२००५ पर्यंत सुरळीत होते. अकोल्यापासून केवळ ३२ किलोमीटर अंतरावर असल्याने नागरिकही कुटुंबासह या ठिकाणी येत असत. मात्र, आनंद सागर अस्तित्वात आल्यानंतर या पर्यटन केंद्राकडे नागरिकांनी पाठ फिरवली. त्यामुळे पर्यटन केंद्र आणि रेस्ट हाऊस गेल्या दहा वर्षांपासून भकास पडले आहे. रेस्ट हाऊसमध्ये एक खानसामा असून, काही नागरिक मासळी खाण्याकरिता या ठिकाणी येतात. मात्र, नियंत्रण नसल्याने रात्री-बेरात्री काही नागरिकांचे जाणे-येेणे सुरू असते.