आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालाजींच्या नकाराचे चिंतन सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी निवडणूक लढवण्यास दिलेल्या नकाराचे नेमके कारण काय?, असा प्रश्न अनेकांना पडला. लालाजींच्या समर्थक भाजप नगरसेवकांनी (तीन नगरसेवक वगळता), विविध संस्था संघटनांच्या प्रतिनिधींनी, पदाधिका-यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना आता माघार नको, असा आग्रह धरला. मात्र, तब्येत साथ देत नसल्याचे कारण पुढे करत त्यांनी आपला नकार कायम ठेवला.

आमदार शर्मांच्या काही समर्थकांनी सोमवारी ‘दिव्य मराठी’मध्ये ‘लालाजींच्या नकाराचा फॅक्स’ ही बातमी प्रसिद्ध होताच प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फॅक्स करत लालाजींनाच पुन्हा तिकीट द्या, अशी मागणी केली. दरम्यान, फॅक्स पाठवणा-या काही नगरसेवकांना तसे न करण्याचा सल्ला पक्षातील वरिष्ठांनी दिला आहे. आमदार शर्मा आजपासून चार दिवसांच्या दौ-यावर बाहेरगावी निघून गेल्याची माहिती मिळाली आहे.

बंडखोरांवर पक्ष मेहरबान का ?
महापालिका निवडणुकीत कॅग रिपोर्टच्या आधारे भाजपचे आमदार चैनसुख संचेती यांच्यावर शिंतोडे उडवणारे पक्षाला आता कसे चालतात, भाजप नगरसेवकांच्या विरोधात उभे राहत पक्षातील उमेदवारांना पाडणारे व महापाालिकेत भाजपची सत्ता स्थापन होऊ नये, महापौर होऊ नये यासाठी कष्ट घेणारे आता कसे चालणार, भाजप आमदारांच्या निधीतून खर्च होणा-या कामावर आक्षेप नोंदवणारा नेता पक्षाचा आमदार कसा होणार, हिंदुत्ववादी भाजपचा विरोध झुगारून स्थायी समिती सभागृहाला टिपू सुलतान हे नाव देण्यास पुढाकार घेणारा नेता कसे काय पक्षाचे तिकीट मागतो, असा प्रश्न कार्यकर्त्यांनी आज विचारला. बंडखोरांवर पक्ष मेहरबान का, या प्रश्नांची उत्तरे शोधा व मग द्या हवे त्याला तिकीट, असा होरा कार्यकर्त्यांचा होता.

लालाजींना पक्षातील गटबाजीचाच त्रास असल्यामुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. यंदा त्यांच्यासाठी अनुकूल वातावरण असतानाही केवळ तब्येत साथ देत नाही, असे कारण सांगून त्यांनी माघार का घेतली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून शर्मा यांनी नकार दिला असल्याची सोमवारी सर्वत्र चर्चा होती.

नगरसेवकांना चूप बसण्याची तंबी
भाजपचे तीन नगरसेवक वगळता इतरांनी लालाजींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. मात्र, ही भेट काहींना न आवडल्यामुळे काही नगरसेवकांची कानउघाडणी करण्यात आली. त्यांना मीडियाशी बोलाल तर खबरदार, अशी तंबी दिली. वरिष्ठांच्या राजकारणात लक्ष देऊ नका, आम्ही बघतो असे म्हणत नगरसेवकांना गप्प करण्यात आले.