आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्‍यात 473 धोकादायक इमारती, मुंबईच्या घटनेनंतर प्रश्‍न ऐरणीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- मुंबईप्रमाणे अकोल्यातही मोठय़ा प्रमाणात धोकादायक जीर्ण इमारती आहेत. शहरातील मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींची संख्या 473 आहे. मनपाने निवडक इमारतींना धोकादायक असल्याची नोटीस बजावून आपली जबाबदारी झटकली. मात्र, अद्यापही या नोटीसला इमारतीतील रहिवाशांनी गांभीर्याने घेतलेले नाही. मुंबईतील दुर्घटनेनंतर अनधिकृत व धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक म्हणून घोषित केलेल्या इमारतीच्या दाढेत हजारो रहिवासी आहेत. या इमारती कोसळण्याचा धोका असल्याने ते भयभीत अवस्थेत मृत्यूच्या छायेत जगत आहेत. धोकादायक इमारतींमुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आह़े. पावसाळा आला की, धोकादायक इमारतींना नोटीस बजावण्याचा एककलमी कार्यक्रम दरवर्षी पालिकेकडून राबवला जातो़ ‘घरे खाली करा, अन्यथा जीवितहानी झाल्यास आपणच जबाबदार’ असल्याची तंबीही नोटीसमध्ये देण्यात येते. मात्र, संभाव्य जीवित अथवा वित्तहानी टाळण्यासाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. पालिका हद्दीत 450 वर धोकादायक इमारती आहेत. बहुतांश इमारतींमध्ये रहिवासी आहेत. जुने शहरातील जयहिंद चौकात अनेक मोठय़ा धोकादायक इमारती आहेत. या धोकादायक इमारतीखालील दुकाने सुरू आहेत. याशिवाय डाबकीरोड, टिळकरोड, माळीपुरा, मोहम्मद अलीरोड, सराफा बाजार, जनता बाजार, अकोट स्टँड, वाशिम स्टँड आदी भागांमध्येही मोठय़ा प्रमाणात जीर्ण इमारती आहेत. याकडे कोणाचेही लक्ष नाही़ संभाव्य घटना टाळण्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाहीत़ त्यामुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ आह़े

अकोल्यात अनेक नव्या इमारती उभारल्या जात आहेत. मात्र, आजही अनेक जुन्या इमारती असून, त्या इमारतींची दुरवस्था कायम आह़े पावसाळ्यात अशा धोकादायक इमारती पडण्याची अधिक शक्यता असते. शंभर वर्षे होत आलेल्या इमारती आजही अकोल्यात उभ्या आहेत़ मात्र, आता अशा इमारतींची दयनीय अवस्था झाली आहे. इमारतींची जागा मालक, विकासक किंवा गृहनिर्माण सोसायट्यांचे मालक लक्ष देत नसल्यामुळेच इमारती धोकादायक बनल्या आहेत़

धोकादायक इमारतींमध्ये राहणार्‍या रहिवाशांना पर्यायी जागा उपलब्ध होत नसल्याने स्वत:चा आणि आपल्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालत अशा इमारतींमध्ये वास्तव्य करत आहेत़ धोकादायक इमारत कधीही पडू शकत़े मात्र, पावसाळ्यात धोकादायक इमारतींची पडझड होण्याची अधिक शक्यता असत़े पावसाळ्यात धोकादायक इमारती पडण्याच्या अनेक दुर्घटनाही अकोल्यात यावूर्वी घडल्या आहेत़ मात्र त्यापासून कुठलाही धड घेतला नाही. आता असंख्य इमारती मोडकळीस आल्या असून, कधीही मोठी दुर्घटना होऊ शकते. महापालिकेने याची गंभीरतेने दखल घेण्याची गरज आहे. महापालिकेकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात करण्यात येत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर केवळ नोटीस बजावून महापालिका आपल्या कर्तव्यापासून हात झटकत आहेत. यावर्षी मोठय़ा प्रमाणात पाऊस पडल्याने त्याचा परिणाम जीर्ण इमारतींवर होऊ शकतो. त्यामुळे योग्य ती दक्षता घेणे आवश्यक झाले आहे.

धोकादायक इमारतीत जिणं आहे आशेवर
शहरात एका फ्लॅटची किंमत सुमारे 15 ते 30 लाखांच्या घरात जात़े सर्वसामान्य नागरिकांना घर घेणे परवडत नाही़ धोकादायक इमारतीत राहणार्‍या रहिवाशांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने राहती घरे सोडली जात नाहीत तसेच धोकादायक इमारत पाडून नवीन इमारत झाल्यास कमी दरात फ्लॅट मिळेल अशी आशा असल्याने रहिवासी जीव धोक्यात घालून धोकादायक इमारतीत राहणे पसंत करतो़