आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधीअभावी जिल्ह्यातील 14 सिंचन प्रकल्पांचे काम थंडावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - खारपाणपट्टय़ासाठी वरदान ठरणार्‍या नेरधामणा प्रकल्पाचे 45 टक्के काम अपूर्ण आहे. प्रकल्पासाठी निधीची समस्या कायम असून, निधीअभावी जिल्ह्यातील 14 सिंचन प्रकल्पांचे काम थंडावले आहे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचे काम मंदावल्याने 67 हजार 562 हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित आहे.

विदर्भात सिंचन उपेक्षित आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेले तीन प्रकल्प राज्यपालांच्या यादीत समाविष्ट असतानाही रखडले आहेत. सिंचन तर सोडाच पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्ष आह़े सिंचन अनुशेष तर दूरच जिल्ह्यातील निर्माणाधीन प्रकल्पांचे काम मंदावले असून, खारपाणपट्टय़ासाठी वरदान ठरणार्‍या नेरधामणा या पथदर्शक प्रकल्पाचे काम 45 टक्के अपूर्ण आहे. राज्यपालांनी या प्रकल्पाला भेट दिली, पण परिस्थिती जैसे थे आहे. सर्व सोपस्कार पूर्ण होऊन या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले होते, पण निधी उपलब्ध होत नसल्याने कामाला विलंब होत गेला आणि आता 1 जुलै 2013 पासून पुन्हा कामाला सुरुवात करण्यात आली आहे. आज या प्रकल्पाचा खर्च 638.35 कोटींवर गेली आहे. या प्रकल्पाच्या सुधारित किमतीला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

या प्रकल्पाचा एकूण पाणी साठा 8.19 दलघमी असून, 1.22 दलघमी पाणी पिण्यासाठी आरक्षित आहे. प्रकल्पाद्वारे सहा हजार 954 सिंचन क्षमता निर्माण होणार असून, प्रकल्पाच्या परिसरातील 32 गावांना त्याचा लाभ होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात या प्रकल्पाचे 45 टक्के काम अपूर्ण आहे. सन 2013-14 साठी शासनाने 95 कोटीची तरतूद केलेली आहे.

जिल्ह्यातील 14 बांधकामाधीन प्रकल्प असून, या प्रकल्पांना सन 2013-14 मध्ये 212.312 कोटी तरतूद शासनाने मंजूर केली आहे. यावर नोव्हेंबर 2013 अखेर 788.31 कोटी खर्च झालेला आहे. हे प्रकल्प 2016 पर्यंत पूर्ण करण्याचे महामंडळ स्तरावर नियोजन असले, तरी प्रकल्प निर्मितीचे काम मंदगतीने सुरू आहे.

घुंगशी-पारद, काटेपूर्णा नदीवरील मंगरूळ कांबे व उमा नदीवरील रोहणा येथील बॅरेजची कामे निधीअभावी बंद पडली आहेत़, तर, काटी पाटी बॅरेजच्या कामाला अद्याप सुरुवात झाली नाही़ शेतकर्‍यांचा विरोध असल्याचे भासवून निधी इतर भागात वळता करण्यात आला आह़े उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावती विभागातील खारपाणपट्टय़ाच्या विकासासाठी 319 कोटी रुपयांची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात कार्यवाही काहीच झाली नसल्याचे चित्र आहे.

विदर्भातील पूर्व-पश्चिम वाहिनी असलेल्या पूर्णा नदीने 7 हजार 500 चौरस किलोमीटरचा प्रदेश व्यापला आहे. यापैकी तब्बल 4 हजार 692 चौरस किलोमीटरचा प्रदेश खारपाणपट्टय़ात येतो. जिल्ह्यातील 373 गावे खारपाणपट्टय़ात आहेत. क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने हजारो हेक्टर शेतीचा पोतही खराब झाला आहे. वर्षानुवर्षे गढूळ व क्षारयुक्त पाणी प्यायल्याने जिल्ह्यातील अनेक गावांमधील नागरिकांना किडनी व पोटाच्या आजाराने ग्रासले आहे. खारपाणपट्टय़ातील अनेक गावांमध्ये विहिरी आहेत. परंतु, सर्वच विहिरींचे पाणी खारे आहे. गोड पाण्याचे दुसरे स्रोत उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना नाइलाजास्तव पिण्यासाठी क्षारयुक्त पाण्याचा वापर करावा लागत आहे.