आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

९२ गावांत जलयुक्त शिवार योजनेचा उद्यापासून प्रारंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गावातील पाणी गावातच जिरवावे, पाण्याची पातळी वाढावी, यादृष्टीने जलयुक्त शिवार योजना राबवण्यात येत असून, जिल्ह्यातील २०० गावे योजनेसाठी निवडली आहेत. यांतील ९२ गावांमध्ये प्रजासत्ताकदिनी योजनेचा शुभारंभ होणार आहे. १६० गावांची शिवार फेरी पूर्ण झालेली असून, खात्यांच्या समन्वयातून कामे पूर्ण केली जातील. सर्वांसाठी पाणी हे ध्येय २०१६ पर्यंत गाठायचे आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात शनिवारी दुपारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात समन्वय राहिला नाही, तर निधी असूनही योजना प्रलंबित राहतात. महत्त्वाच्या बैठकींना अधिकारी अनुपस्थित असतात, ही गंभीर बाब असून, यापुढे हा प्रकार सहन केला जाणार नाही, अशा शब्दांत डॉ. पाटील यांनी सुनावले. अकोल्यातील लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचा डाव काही अधिकारी करत असल्याचा आरोप समिती सदस्यांनी केला. प्रभारी आयुक्त शिवाजीराव दिवेकर यांच्या कार्यपद्धतीबाबत सदस्यांनी नाराजी प्रकट केली.

अकोल्याच्या महापौर उज्ज्वलाताई देशमुख यांनी शहरातील समस्या मांडताना मावळते आयुक्त महेंद्र कल्याणकर यांची बदली झाल्यानंतरही ते मनपाच्या कारभारात हस्तक्षेप करतात, असा आरोप केला. अकोल्यातील सांस्कृतिक भवनासाठी १० कोटी मिळणार आहेत. परंतु, जागेची अडचण आहे, यासह अन्य विषयांवर समिती सदस्य विजय अग्रवाल, सामाजिक न्याय भवन, घरकुलाचा प्रश्न याबाबत सुनील मेश्राम, अकोट-तेल्हाऱ्यातील प्रश्न समिती सदस्य जयश्री मानकर, अकोल्यातही दारूबंदीव्हावी, याकडे नगरसेविका उषाताई विरक यांनी लक्ष वेधले. जिल्हाधिकारी अरुण शिंंदे यांनी प्रशासनाची बाजू मांडली. प्रभारी आयुक्त शिवाजीराव दिवेकर यांनाही सदस्यांनी बोलते केले. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रश्नांची उत्तरे दिली.

जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदरसिंग, उपायुक्त वामन काळे व्यासपीठावर होते. सभेचे संचालन, प्रास्ताविक जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ यांनी केले.

बैठकीत विविध विषयांवर चर्चा
अकोला जिल्ह्यातही दारूबंदी करा, प्रत्येक रेशन दुकानावर बायोमेट्रिक्स यंत्रणा असावी, नियोजनाअभावी अकोला मनपाचे ३० कोटी रुपये पडून, रस्त्यांची कामे २७ जानेवारीपासून सुरू, बदली होऊनही कल्याणकरांचा मनपात हस्तक्षेप, दूषित पाणीपुरवठा होणाऱ्या १० गावांना आरआेद्वारे पाणी पुरवावे, मूर्तिजापूर पाणीसमस्या, तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची कामे सुरू करा, बार्शिटाकळी तालुक्यातील कृषी पंप, वीजजोडणी, अकोटमधील ३० टक्के भागाला अपुरा पाणीपुरवठा, कापशी तलाव पर्यटनक्षेत्र विकास, अकोला महोत्सव सुरू करा, सर्वोपचार रुग्णालयात नवीन सिटी स्कॅन मशीनचा प्रस्ताव पाठवा, सामाजिक न्याय भवन, सांस्कृतिक भवनसाठी जागा द्या, महानच्या दोन पंपांचे उन्हाळ्यापूर्वी करा नियोजन आदींसह विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली.