आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाताला तेल लावून महिलेचे लुटले दागिने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका महिलेला दोन भामट्यांनी समोर दंगा सुरू आहे. अंगावरील दागिने काढून ठेवा, असे सांगून महिलेच्या हातातील बांगड्या काढण्यास मदतही केली. एवढेच नव्हे, तर बांगड्या निघत नसल्यामुळे चोरट्याने स्वत:जवळील तेल महिलेच्या हातावर ओतून बांगड्या काढल्या व बेंटेक्सचे दागिने महिलेच्या हातात देऊन ते पसार झाले. ही घटना 7 जुलै रोजी आदर्श कॉलनीतील बालविकास प्रकल्प कार्यालयाजवळ घडली.
प्रभा उमेश अग्रवाल (वय 45) असे दागिने लुटण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला आदर्श कॉलनीमध्ये स्वप्निल निवास 48 मध्ये राहते. प्रभा अग्रवाल सोमवारी सकाळी 7.45 वाजताच्या दरम्यान त्यांच्या कुत्र्याला घेऊन मॉर्निक वॉकसाठी जातात. त्या घरी परतत असताना घरापासून हाकेच्या अंतरावर 25 आणि 30 वयोगटांतील दोघे जण उभे होते. त्यातील एकाने त्यांना आवाज दिला, समोर दंगा सुरू आहे, वातावरण तंग आहे. अंगावरील दागिने काढून ठेवा, आम्ही पोलिस आहोत, घाबरू नका, असे म्हटल्यावर अग्रवाल घाबरल्या. घर जवळच आहे, असे म्हणून सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ केली. मात्र, गोड बोलून पुन्हा चोरट्यांनी दागिने काढण्याचे सांगितले. त्यावर महिलेने गळय़ातील 10 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत काढली.
मात्र, हातातील पाच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या निघत नसल्याचे पाहून चोरट्याने त्यांना मदत केली. मात्र, बांगड्या निघत नसल्याचे लक्षात येताच दुसर्‍या भामट्याने लगेच त्याच्या खिशात असलेली तेलाची बॉटल काढली व महिलेच्या हातावर रिचवली व बांगड्या काढण्यास मदत केली. सोन्याचे दागिन्याची पुडी बांधत असताना काही क्षणातच चोरट्यांनी हातचलाखी करत महिलेचे दागिने घेऊन, बेंटेक्सच्या बांगड्या आणि गळय़ातील पोत पुडीत बांधली आणि ते पसार झाले.