आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांजर मेलेले पाणी प्‍याले भावी डॉक्‍टर, जितेंद्र आव्‍हाडांनी साधला संवाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालय अकोला येथे गुरुवारी, 17 जुलै रोजी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व फलोत्पादन मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी रुग्णालयाची पाहणी करत विद्यार्थ्यांसोबत ‘कॉफी विथ स्टुडंट्स प्रोग्राम’च्या माध्यमातून संवाद साधला. दुपारी 3.15 ते 5.45 असे तब्बल अडीच तास मंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुंदरदास भगत, अधीक्षक अभियंता विजय भाले हे तिघेच अधिकारी उपस्थित होते. सर्व प्राध्यापक व कर्मचार्‍यांना बाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोकळ्या मनाने तक्रारी मांडल्या. एक एक तक्रार ऐकून घेत डॉ. आव्हाड यांनी त्यांचे ऑन द स्पॉट सोलूशन अधिकार्‍यांना सांगिंतले. सुविधा पुरवण्याची जबाबदारी अधिष्ठातांची आहे. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची मदत घेऊन समस्यांचे निराकरण करणे अपेक्षित असल्याचे डॉ. आव्हाड म्हणाले.

माझ्याशी मस्ती करायची नाही
तक्रार आल्यास मी जर डॉ. हुसेनीला निलंबित करू शकतो, तर कुणालाही निलंबित करू शकतो, अशा शब्दात अधिकार्‍यांना इशारा देत माझ्याशी मस्ती करायची नाही, अशी धमकीवजा सूचना डॉ. आव्हाड यांनी दिली.
अन् अखेर सर्वांच्या चेहर्‍यावर हास्य
आमच्याशी सीनिअर्स बोलत नाही, अशी तक्रार करणार्‍या विद्यार्थिनीने आता आमचे सीनिअर्स आमच्याशी सौहार्दपूर्ण वागणूक ठेवत संवाद साधतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मंत्री शहरात, जिल्हाध्यक्ष शहराबाहेर! : डॉ. आव्हाड यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष र्शीकांत पिसे पाटील यांनी उपस्थित राहणे, हा पक्षाचा अघोषित प्रोटोकॉल असताना त्यांनी मंत्र्यांना केवळ एक भेट दिली. त्यानंतर मूर्तिजापूर येथे कार्यक र्त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या शपथविधी सोहळय़ाला उपस्थित राहण्यास प्राधान्य दिले.
विद्यार्थ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा
जिल्हाधिकार्‍यांची धावपळ : वसतिगृहाच्या पाहणीदरम्यान मंत्री महोदयांनी जिल्हाधिकार्‍यांना बोलावून घेतले. कलेक्टर साहेब, तुम्ही लक्ष घाला, अशी सूचना डॉ. आव्हाड यांनी केली. जिल्हाधिकारी शिंदे यांनी हो साहेब, असे उत्तर देत वेळ मारली.
वसतिगृहाची केली पाहणी
वसतिगृहाची मंत्र्यांनी पाहणी केली. तत्काळ समस्यांबाबत अँक्शन घेण्याची सूचना अधिष्ठातांना करण्यात आली. दरम्यान, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्याशी मोबाइलद्वारे संवाद साधून स्वच्छता करण्याची सूचना केली. या वेळी जिल्हाधिकारी अरुण शिंदे, एसडीओ प्रा. संजय खडसे, तहसीलदार संतोष शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते.
पैसे गेले तरी कुठे? : रुग्णालयाच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये पाठवले. मात्र, थातूरमातूर दुरुस्ती करून सार्वजनिक बांधकाम विभागाने पांघरूण घालण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. मग कोणत्या बाबींवर खर्च केला, असा जाब कार्यकारी अभियंता भगत यांना विचारला. भगत त्याचे उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे तुम्हाला जमत नसेल तर नोकरी सोडा, असा इशारा डॉ. आव्हाड यांनी दिला
डॉ. ठोकळचा राजीनामा : वैद्यकीय अधिकारीपदावर कार्यरत डॉ. गजानन ठोकळ यांना विद्यार्थ्यांनी तक्रार केल्याचे माहीत पडताच अधिष्ठातांकडे राजीनामा दिला आहे. डॉ. हुसेनींप्रमाणेच तेसुद्धा विद्यार्थिनींना वाईट नजरेने पाहतात, अशी तक्रार झाली.
15 दिवस मांजर टाकीत : 15 दिवस मांजर मरून पडलेल्या पाण्याच्या टाकीतील पाणी विद्यार्थी, रुग्ण पित होते. कार्यकारी अभियंता भगत यांच्याकडे तक्रार करूनही त्यांनी दखल घेतली नाही. ‘भगत तुमच्या संवेदना मेल्यात का’ असे डॉ. आव्हाड म्हणाले.
सीनिअर्सकडून होते रॅगिंग : चर्चेदरम्यान सीनिअर्सकडून रॅगिंग होते म्हणून आम्ही त्यांच्यासोबत बोलायचे टाळतो, अशी माहिती

एका विद्यार्थिनीने दिली. मंत्री महोदयांनी याबाबत खेद व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी एकमेकांशी आंतरसंवाद साधावा, असे ते म्हणाले.
डॉ. हुसेनी निलंबित : मंत्री महोदयांनी डॉ. हुसेनी यांना ऑन द स्पॉट निलंबित केल्याचे जाहीर केले. वरिष्ठ लिपिक विवेक भेंडेकर हे स्वत:ला डीन समजत असून, विद्यार्थ्यांशी गैरव्यवहार करतात, असा आरोप विद्यार्थ्याने केला. त्यालाही निलंबित केले.

अधिकार्‍यांचे केले पोस्टमार्टम
इंटर्नशिपचा भत्ता अद्याप दिला नाही, हॉल आजच उघडला, एनएमसीच्या नावावर आर्थिक लूट होते. त्याचा पैसा अधिष्ठातांच्या अकाउंटमध्ये जमा होतो, सुरक्षा राहिली नाही, वसतिगृहामध्ये चांगले जेवण दिले जात नाही, स्कॉलरशिपचे पैसे अजून मिळाले नाही, एकाच वर्गात द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिकवल्या जाते, वसतिगृहासमोर ऑटो उभे केले जातात, पालकांना जागा नाही, नर्सिंगला दोन वर्षांपासून जागा नाही, अशाप्रकारे जवळपास 30 वेगवेगळ्या प्रकारच्या लेखी व तोंडी तक्रारी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी मांडल्या.