आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामनगरातील मंदिराच्या जागेवरून उफाळला वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला-काळा मारुती मंदिराच्या जागेवरून रामनगरमध्ये शुक्रवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास वाद झाला. मंदिराच्या जागेतील ओटे तोडण्यासाठी कामगार गेले असता स्थानिक नागरिकांनी त्यास विरोध केला. सिव्हिल लाइन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाद शांत केला. स्थानिक नागरिकांची बैठक घेऊन या भूखंडाच्या तिढय़ावर तोडगा काढण्याच्या सूचना पोलिसांनी संबंधित भूखंडधारकाला दिल्याने वाद निवळला. या भूखंडासंदर्भात देवानंद नवलकार व रामनगरातील इतर नागरिकांनी विभागीय आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे.

रामनगरमध्ये शेत सर्वे नं 5/15/16 मौजे उमरखेड येथील जमिनीवर जय काळा मारुती मंदिर आहे. या मंदिराची सुमारे 100 बाय 100 चौरस फूट जागा आहे. इतर खुले भूखंड सांस्कृतिक भवन व खुल्या मैदानासाठी आरक्षित असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. मंदिराच्या बाजूची जमीन विनोद तोष्णीवाल यांच्या मालकीची असून, त्यांनी जमिनीचा गुंठेवारी पद्धतीने नकाशा मंजूर करून घेतला आहे. विनोद तोष्णीवाल यांनी आज मंदिराच्या बाजूला बांधलेले ओटे तोडण्यासाठी कामगार पाठवले होते. स्थानिक नागरिकांनी झाडांभोवती उभारलेले ओटे मंदिर संस्थानच्या जागेतील असल्याने ते तोडण्यास विरोध केला. त्यामुळे रामनगरमध्ये वाद उद्भवला होता. या वादाची माहिती मिळताच सिव्हिल लाइन पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक प्रकाश सावकार यांनी स्थानिक नागरिक व विनोद तोष्णीवाल यांच्याशी चर्चा करून प्रकरण समजून घेतले. या वेळी नगरसेवक अजय शर्मा, नगरसेवक आशीष पवित्रकार आदी उपस्थित होते.

न्यायप्रविष्ट प्रकरण : मनपा आयुक्तांकडील प्रकरण एल 2-/61/13-14 नकाशाप्रमाणे मंदिराची जागा ही 6.5 बाय 34.75 मि. दर्शवली आहे. प्रत्यक्षात मंदिराची जागा 100 बाय 100 फूट असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात अकोला न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

मंदिराच्या नावावर जमीन हडपण्याचा प्रयत्न
रामनगर परिसरातील ती जागा खासगी मालकीची असून, त्यावर मंदिर आहे. मंदिरापुरती जागा सोडण्याची आमची तयारी आहे. मात्र, मंदिराच्या नावावर आजूबाजूच्या जागेवरदेखील अतिक्रमण करून ती बळकावण्याच्या दृष्टीने देवानंद नवलकार यांचे प्रयत्न सुरू आहेत. याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी तक्रार दाखल करणार आहे. विनोद तोष्णीवाल, अकोला.