आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसमंत निनादणार हर्रऽऽ बोला महादेवच्या गजराने; अकोल्यात शिवभक्त सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- हर्रऽऽ बोला महादेव, वाघोलीचा सहादेव म्हणत कावडधारी आनंदोत्सव साजरा करत वाघोली (गांधीग्राम) कडे 1 सप्टेंबरला सायंकाळी रवाना झाले. श्रावणातील शेवटच्या सोमवारी गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे जल कावडने आणून राजराजेश्वराला जलाभिषेक करण्याची अकोल्याची 68 वर्षांची परंपरा असून, यंदाचे 69 वे वर्ष आहे. यंदाही राजेश्वराला साकडे घालण्यासाठी, भक्तिभावाने जलाभिषेक करण्यासाठी शिवभक्त सज्ज झाले आहेत. कावड, पालखी मार्गावर ठिकठिकाणी खाद्यपदार्थ वितरण व्यवस्था, स्वागतकमानी, स्वागतफलक उभारण्यात आले आहेत.

कावड, पालखी उत्सव शेवटच्या श्रावण सोमवारी होत असला तरी त्याला खर्‍या अर्थाने रविवारी सकाळपासूनच प्रारंभ होतो. आज सकाळी शहरातील कावडधारी मंडळ आपल्या कावडच्या बांधणीला लागले होते. दोरी, बासे, बल्ल्यांच्या साहाय्याने मजबूत कावड बांधून त्याला दोरीने गुंफलेली भरणे बांधण्यात आली. शेकडो शिवभक्तांची कावड उत्सवाच्या तयारीसाठी लगबग सुरू होती. कुणी दोरी आण, कुणी छापील टी शर्टचे वितरण व्यवस्थेत गुंतला होता. कुणी शिवभक्तांच्या जेवणाची व्यवस्था सांभाळण्यात व्यस्त होते. वाहनांची जमवाजमव, सायंकाळचे जेवण, प्रवास, सोमवारचे सकाळचे जेवण, परतीचा प्रवास आदींवर चर्चा सुरू होत्या. डाबकीरोडवासी कावड, जुने शहर, शिवाजीनगर,हरिहरपेठ, तेलीपुरा, अकोटफैल आदी ठिकाणी मोठय़ा कावड बांधणीचे काम सुरू होते, तर गांधीग्राम येथे कावड उत्सवाच्या निमित्ताने रात्रीला पोहोचणार्‍या शिवभक्तांसाठी मार्गावर तसेच नदीपात्राच्या परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली. नदीत कुणी वाहून जाऊ नये म्हणून आपत्ती निवारण पथकही सज्ज ठेवण्यात आले होते.

चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तेथील नागरिकांनी शिवभक्तांच्या स्वागतासाठी स्वागतकमानी उभारल्या होत्या. अकोल्यातील अनेक संस्था, व्यक्तींनी गांधीग्राम ते अकोल्यातील राजेश्वर मंदिरापर्यंतच्या मार्गावर ठिकाणी खिचडी, भाजी-पोळी, चहा, फराळ, पाणी पाऊच आदींच्या वितरणाची व्यवस्था केली आहे. 451 भरण्यांची अजस्र डाबकीरोडवासी कावड सायंकाळी 5 च्या दरम्यान गांधीग्रामकडे रवाना झाली. तत्पूर्वी कावडचे मान्यवरांच्या हस्ते रीतसर पूजन होऊन विश्वमानव मंदिरात आरती करण्यात आली. त्यानंतर डाबकी मार्गावर एक फेरी मारून कावड, कावडधारी आपल्या लवाजम्यासह गांधीग्रामकडे रवाना झाले.