आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा संपूर्ण राज्यात आपले वेगळेपण जपणार्‍या कावड उत्सवाचे खास फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- विदर्भच नव्हे तर संपूर्ण राज्यात आपले वेगळेपण जपणार्‍या अकोल्यातील कावड, पालखी उत्सवाचे गत काही वर्षांपासून मुख्य आकर्षण ठरलेली डाबकीरोडवासीयांची कावड पाहिल्यानंतर अनेकांच्या तोंडातून केवळ ‘अरे बापरे’ हेच शब्द बाहेर पडतात. 120 फूट लांबीच्या या कावडमध्ये 451 भरण्यांचा समावेश असून, या कावडचे वजन पाच टन आहे. हजारो शिवभक्तानी आपल्या खांद्यांवर 16 किलोमीटर दिवस-रात्र प्रवास करत त्या कावडने राजराजेश्व ग्राम दैवताला आज अभिषेक केला .
डाबकीरोडवरील डाबकीरोडवासीयांची कावड 2009 पासून या उत्सवाचे आकर्षण ठरली आहे. डाबकीरोडवरील हजारो शिवभक्तांतर्फे दरवर्षी 451 भरण्यांच्या अजस्र कावडने राजेश्वराला जलाभिषेक होतो. 2003 मध्ये डाबकीरोडवासींनी कावडचा प्रारंभ केला. सुरुवातीला 251 भरण्यांची कावड 2009 मध्ये 451 पर्यंत वाढवली. तेव्हापासून ती कायम आहे. या कावडची लांबी 120 फूट, रुंदी 16 फूट तर महादेवाच्या मूर्तीसह उंची 14 फूट आहे. कावडला वाहून नेणार्‍या शिवभक्तांची संख्या अडीच हजारांवर आहे. कावडसोबत दरवर्षी तीन वेळचे जेवण, टँकर, रुग्णवाहिका व इतर वैद्यकीय सेवा, वीज व्यवस्था राहते. ही कावड बांधणारे पिंटू कुकडे यांनी सांगितले, की कावड बांधण्यासाठी त्यांना 21 मोठे बंडल नारळाची दोरी लागते तसेच 80 बल्ल्या व 30 बासे लागतात. 120 फूट लांबीच्या कावडला 27 गाले असून, कावडला एकावेळी 240 शिवभक्त खांद्यांवर घेऊ शकतात. कावडधारींना विर्शाम देण्यासाठी 14 लोखंडी स्टेपनी आहेत, तर कावडधारींना योग्य दिशानिर्देशासाठी कावडवर समोर, मधे आणि सर्वात मागे असे तीन शिवभक्त शिटी व हातात दोरी घेऊन उभे असतात तसेच ध्वनिक्षेपकासह चालणारा ट्रॅक्टर निर्देश देतो. या कावडमधील भरण्यांच्या एका गुच्छाचे वजन 45 किलो असून, असे एकूण 50 गुच्छे आहेत. बल्ली, बासे, दोरी, भरण्यांचे गुच्छे व प्रत्येक भरण्यातील साडेचार ते पाच लिटर पाण्यासह संपूर्ण कावडचे वजन सुमारे पाच टनांवर पोहोचते. डाबकीरोडवासी कावडधारी यंदा गुलाबी व काळ्या रंगाचे टी शर्ट परिधान करणार आहेत.

मान्यवरांकडून पूजन
डाबकीरोडवासीयांची कावड गांधीग्रामला रवाना होण्यापूर्वी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी कावडचे पूजन केले. यामध्ये विजय अग्रवाल, प्रतुल हातवळणे, विलास शेळके, डॉ. अशोक ओळंबे, प्रदीप देशमुख, विनोद मनवानी, दीपक मायी, हिरालाल कृपलानी, योगेश गोतमारे, सतीश ढगे, मनोज गायकवाड, संतोष पवार आदींचा समावेश होता. त्यानंतर कावड विश्वमानव मंदिरात पोहोचून तेथे आरती करून खिचडी वितरण झाले. त्यानंतर परिसरात एक फेरी मारून कावड गांधीग्रामकडे रवाना झाली.

डाबकीरोडवासी कावडधारींची संख्या हजारांत असल्याने त्यातील जेवणाची व्यवस्था महत्त्वपूर्ण आहे. भोजनाची व्यवस्था साहू महाराज हे आचारी आपल्या दहा महिला सहकार्‍यांसह करतात. जेवण तयार करण्यासाठी अडीच पोते गहू, एक क्विंटल कवळे, 70 किलो बटाटे, तीन हजार पत्रावळी, तीन गॅस सिलिंडर, तीन तेलाचे डबे व इतर साहित्य लागते. स्वयंपाकाची व्यवस्था राजू शेळके सांभाळतात. यंदा कावडधारींनी अकोल्यातून रवाना होताना गजानन मित्र मंडळाच्या खिचडीचा आस्वाद विश्वमानव मंदिरात घेतला.दुपारी 4 पासून ते रात्री 10 पर्यंत कावडधारी, वाहनांचा ताफा, जेवण सर्व गांधीग्रामला पोहोचते. तेथून पूर्णा नदीचे जल भरून प्रवासात रात्री 1 ला कावडधारी जेवण घेतात. या जेवणात कवळ्याची भाजी व पोळीचा समावेश राहील, तर सोमवारी सकाळी पाचमोरीजवळ कावडधारी जेवण करणार असून, त्यात बटाट्याची भाजी व पोळीचा समावेश राहील. गांधीग्राम येथे जल भरण्यासाठी तरुणांकडून भरण्यात जल भरून घेतात. या युवकांसाठी बटाटे, टोमॅटो, कोबीची भाजी व पोळ्या असा मेनू आहे.