अकोला - मागील काही दिवसांपासून शहरात रॉकेलचा काळाबाजार होत असल्याने शिधापत्रिकाधारकांना मात्र रॉकेलपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
शहरातील शिधापत्रिकाधारकांनी गेल्या काही दिवसांपासून रॉकेल मिळत नसल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे केल्या आहेत. मात्र, या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरामध्ये 151 रॉकेल परवाने असून, 71 किरकोळ रॉकेल परवाने आहेत. या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांना रॉकेल वितरण के ले जाते. मात्र, शिधापत्रिकाधारकांना रॉकेल न देता वाहनधारकांना चढय़ा दराने विक्री केली जात असल्याचा आरोप होत आहे. राज्य शासन पुरवठा विभागातर्फे शहरात सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत धान्य आणि रॉकेलचे वितरण होते. नागरिकांनी शहरातील अनेक भागांत रॉकेल मिळत नसल्याच्या तोंडी तक्रारी वारंवार संबंधितांकडे केल्या आहेत. मात्र, प्रशासनाने यावर कोणतीही उपाययोजना केली नाही. पुरवठा विभागाने शिधापत्रिकाधारकांना रॉकेल मिळत असल्याचा दावा केला. मात्र, त्यांचा हा दावा फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील कार्डधारकांची संख्या
6,277 बीपीएल
1,488 अंत्योदय
63,559 केशरी
4,091 शुभ्रकार्ड
531 बंद मिल
1,418 विधवा विकास
22 दुर्धर आजार
रॉकेल परवाने : 124
स्वस्त धान्य दुकाने: 151
रॉकेल परवाने : 71
शिधापत्रिकाधारकांना नियमित रॉकेल वितरित केले जाते. नागरिकांना रॉकेल मिळावे याबाबत दक्षता घेण्यात येते.’’ अशोक शिंदे, अन्न व धान्य निरीक्षक अधिकारी.