आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खामगावच्या गुप्ता इंडस्ट्रीजला आग, ४ लाख लिटर पाणी, ८० फेऱ्या, १५ तासांची शर्थ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
खामगाव - येथील एमआयडीसीतील गुप्ता इंडस्ट्रिजमध्ये गुरुवार, ३० एप्रिल रोजी रात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास शाॅर्टसर्किटमुळे अचानक आग लागून लाखो रुपयांच्या मालमत्तेची हानी झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, जवळपास १५ तासानंतर ही आग आटोक्यात आली अाली. त्यासाठी पाच नगरपालिकांच्या अग्नीशामक दलाच्या वाहनांसह खासगी टँकरद्वारे जवळपास चार लाख लीटरपेक्षा अधिक पाण्याचा मारा करण्यात आला.

रात्रीच्या सुमारास ही आग लागल्याचे तेथील वाॅचमनच्या निदर्शनास आले. त्यानंतर इंडस्ट्रिजचे मालक अरुण गुप्ता यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशामक दल व पोलिसांना माहिती देण्यात आली. आगीची व्याप्ती मोठी असल्याने आग लागलेल्या परिसरातील ५०० मीटरमध्ये त्याची आस लागत होती. या आगीत इंडस्ट्रिजमधील सरकी, ढेप व तेल असे साहित्य जळून खाक झाले. ही आग विझवण्यासाठी खामगावच्या दोन, मलकापूर, शेगाव, नांदुरा, अकोला, जळगाव जामोद येथील नगरपालिकांचे अग्निशामक दल आणि ४०७ वरील टँकरद्वारे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्राधान्याने खामगाव अग्निशामक दलाचे सहाय्यक अग्निशामक अधिकारी नागेश रोठे, चालक मोहन अहिर, एल. डब्ल्यू. शिंदे, एम. व्ही. गौतम, ए. बी. हट्टेल, रमेश वैराळे, जयंत देशमुख, वासुदेव तायडे, किशोर गवई, शंकर कोकाटे आदी कर्मचाऱ्यांसह जवळपास दीडशे नागरिकांनी प्रयत्न केले.
शुक्रवार, एक मे रोजी आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत तक्रार देण्यात आली नव्हती. आग आटोक्यात आली असली तरी या आगीची धग काही प्रमाणात कायम आहे. पहाटेपर्यंत ही आग पूर्णपणे विझवण्यात यश येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

अद्याप नुकसानीचा अंदाज नाही
या आगीत नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज आला नाही. त्यामुळे पोलिसांत उशिरापर्यंत तक्रार देण्यात आली नव्हती. मात्र, या आगीत इंडस्ट्रीजमधील सरकी, ढेपेची पोती आणि तेल असा मोठ्या प्रमाणावर माल जळून खाक झाला. त्यामुळे प्रत्यक्ष नुकसानीचा अंदाज काढण्यास वेळ लागण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. आगीमुळे गोदामावरील टिनपत्रे उष्णतेने गळून पडली होती. भिंतींनाही तडे गेले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अग्निशामक दलाच्या ८० फेऱ्या
ही आग विझवण्यासाठी जवळपास १५ तासांचा कालावधी लागला. यामध्ये पाणी आणण्यासाठी अग्निशामक दल व खासगी टँकरच्या जवळपास ८० ते ९० फेऱ्या झाल्या. त्यासाठी जवळपास चार लाख लिटरपेक्षा अधिक पाणी वापरण्यात आले. यासाठी एमआयडीसी पाणीपुरवठा योजना, हिंदुस्थान लिव्हर, शाकंबरी इंडस्ट्रिज आणि पालिकेच्या बालाजी प्लाॅट हायरपंपावरून पाणी आणण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

आगीच्या ६१ घटना
खामगाव तालुक्यात वर्षभरात ६१ आगीच्या घटना घडल्या. यामध्ये लहान-मोठ्या मिळून २० आगी या एमआयडीसी परिसरात, शहर परिसरात २० आणि ग्रामीण भागात ११ आगी लागल्या होत्या. त्यात एमआयडीसीमधील रेणुका इंडस्ट्रीजमध्येही आग लागून लाखाेंचे नुकसान झाले होते.
^
शाॅर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग आटोक्यात आली असून, अद्याप त्याबबत तक्रार दाखल झाली नाही.
ओमप्रकाश अंबाडकर, ठाणेदार, शिवाजीनगर, खामगाव)