आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतर्कतेमुळे टळला अपहरणाचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गुन्हेगार गुन्हा करतो. त्याने केलेल्या गुन्ह्यांमुळे गुन्ह्याची झळ बसलेल्या व्यक्तींना विलक्षण त्रास होतो. पण, गुन्हा घडण्यापूर्वीच अवतीभोवतीच्या माणसांनी जर गुन्हेगाराला अपकृती करण्यापासून रोखले, तर दु:खद घटना टाळता येतात, असाच अनुभव केळीवेळी येथील एका दाम्पत्याला आला. ऑटोचालकाच्या सतर्कतेमुळे त्यांच्या जुळ्या चिमुकल्यांचे अपहरण टळले.

शहरातील अशोक वाटिकेमध्ये केळीवेळी येथील राहुल भटकर हे त्यांच्या पत्नीसह यश आणि अंजू (५) या चिमुकल्यांना एका लग्न समारंभासाठी आले होते. सोहळा आटोपला तशी वाटिकेतून बाहेर पडणांची एकच गर्दी झाली. राहुल हेसुद्धा आपल्या परिवारासह बाहेर आले. त्यांनी एका ऑटोला हात दिला. चालक मोहम्मद तस्लिम अब्दुल नब्बी (२५, रा. तेलीपुरा चौक) यांनी ऑटो थांबवला. दरम्यान, समारंभासाठी आलेल्या इतर ओळखीच्या व्यक्ती भेटल्याने भटकर दाम्पत्य त्यांच्याशी बोलत होते.

या वेळी यश आणि अंजू दोघेही ऑटोत जाऊन बसले. दरम्यान, कुणाचे लक्ष नसल्याचे पाहून त्या ठिकाणी उभा असलेला किशोर रामा राठोड (रा. शिवर, मध्य प्रदेश) या भामट्याने दोन्ही चिमुकल्यांना ऑटोतून खाली ओढण्याचा प्रयत्न केला. या वेळी चालक तस्लिम यांनी त्यांना हटकले, तर "ये मेरेही बच्चे है', असे उत्तर त्याने त्यांना दिले. तस्लिम यांना संशय आल्याने त्यांनी राहुल यांना आवाज दिला. राहुल लगेच जवळ आले. आपल्या मुलाचे अपहरण होत होते, हे त्यांना कळाले. दरम्यान, नागरिकांनी गर्दी केली. काहींनी किशोर याला मारण्याचा प्रयत्न केला. पण, तस्लिम यांनीच त्यांना तसे करण्यापासून रोखले आणि चिमुकल्यांच्या आई वडिलांसह अपहरणाचा प्रयत्न करण्या किशोरला घेऊन कोतवाली पोलिस ठाणे गाठले. यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

ती आई होती म्हणून..
अशोकवाटिके जवळ अवघ्या दहा मिनिटांत हा सर्व प्रकार घडला. तो भामटा जर आपल्या चिमुकल्यांना घेऊन जाण्यास यशस्वी ठरला असता, तर या विचाराने यश आणि अंजू यांच्या आईला रडू कोसळले. पण, तसे काही झाले नाही. दुःखद घटला टळली, हे पाहून दुसच क्षणी तिच्या चेह-यावर हसू उमटले. मात्र, मागील काही दिवसांपासून शहरात असे अनेक जण फिरत आहे. लहान मुलांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच पालिसांनी अशा गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे.

सराईत गुन्हेगार?
किशोरनेसुरुवातीला ही आपलीच मुलं असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिस ठाण्यात गेल्यानंतर हे आपल्या भावाचे मुलं असून, त्यांच्या आईचे निधन झाले आहे, असे सांगितले. त्याच्या या विसंगत उत्तरामुळे तो मनोरुग्ण असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण, तो मुलांचे अपहरण करणारा सराईत गुन्हेगार आहे का, ही शक्यताही पोलिस तपासून पाहत आहेत. शहरात नागरिकांनी आपल्या लहान मुलांवर लक्ष देऊन अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...