आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्यांचा नृत्याविष्कार, रामकृष्ण किड्स स्कूलचे स्नेहसंमेलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - डाबकी रोड येथील रामकृष्ण किड्स स्कूलमध्ये २४ जानेवारी रोजी झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी नृत्याविष्काराचा नजराणा पेश केला. हिंदी, मराठी गीतांवर बहारदार नृत्य, प्रबोधनात्मक, विनोदी नाटकांमध्ये चिमुकल्यांनी केलेल्या अभनियाने मने जिंकली. शाळेचे अध्यक्ष वैभव कनोजे मुख्याध्यापिका स्वाती झापर्डे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

नृत्यात नऊवारी, फेटा घातलेल्या पारंपरिक वेशातील मुली आणि वेस्टर्न मुली यांची जुगलबंदी आकर्षणाचा विषय होता. इयत्ता चौथीच्या मुलांनी केलेल्या पंढरपुराची शान देवा तुझं देऊळ नृत्याने पंढरपुराचे दर्शन घडवले.

इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी अपना हर दिन, मुलींनी सजना आभी जा, गुंजी अंगनामे शहनाई या गीतावर तर मुलांनी हनी सिंगच्या लव डोस या गीतावर नृत्य सादर केले. इयत्ता तिसरीच्या मुलांनी नाटिकेतून झाडे लावा झाडे जगवाचा संदेश दिला. दुसरीच्या मुलांनी केलेल्या आईचा विश्वास या नाटकात परदेशात गेलेली मुलं आणि भारतातील आईची अवस्था याचे चित्रण केले. इयत्ता दुसरी, तिसरी चौथीच्या मुलांनी नाटकातून पाळणाघराचे महत्त्व विशद केले. इयत्ता सहावीच्या मुलांनी कश्मीर मै तू कन्याकुमारी, वन टू थ्री फोर, हिप हॉप या गीतांवर नृत्य, तर दुसरीच्या मुलांनी चिल चिल चिल्लाके या गीतावर नृत्य केले.

सीनिअर केजीच्या मुलांनी विविध राज्यांची वेशभूषा करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा आदित्य मंडोकार, संजना मंडलिक, रिया टोपरे, रोहित चोपडे, शंतनू देवीकर यांनी सांभाळली.

शिक्षिका-मुलींचा फॅशन शो : सांस्कृतिककार्यक्रमाच्या शेवटी शिक्षिका मुलींचा फॅशन शो झाला. साडी, नऊवारी, घागरा, पंजाबी ड्रेस अशा विविध पोशाखातील शिक्षिका मुलींनीच्या जोडीने केलेले रॅम्प वॉक् आकर्षक ठरले.

परिसरात चैतन्य
सकाळीशाळेतील चिमुकल्यांनी शाळेच्या परिसरातून काढलेल्या पालखीने परिसरात चैतन्य निर्माण केले. शाळेपासून सुरू झालेल्या पालखीचा गजानन महाराज मंदिरात आरतीने समारोप झाला. दिंडीत वारकऱ्यांच्या वेशातील मुलांनी पावली खेळली. तसेच चिमुकल्यांनी केलेल्या संत गजानन महाराज, संत तुकाराम, संत निवृत्ती, संत चांगदेव, विठ्ठल-रुख्माई यांच्या वेशभूषा लक्षवेधी ठरल्या.