आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरी बंधाऱ्याला येतील काय "अच्छे दनि'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - एकीकडे अकोल्यासह विदर्भातील अनेक जिल्‍ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ओरड होत असताना ग्रामीण भागात नाला तसेच नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यातून लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याला भाजपच्या कार्यकाळात "अच्छे दनि' येतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रसिद्ध शेती अभ्यासक तथा शेतकरी ना. धो. महानोर यांनी राज्यातील पाण्याचा प्रश्न उपस्थित करून शेतीला पाणी मिळावे, या प्रमुख उद्देशाने गावातून वाहणाऱ्या नदी, नाल्यावर छोटेखानी बंधाऱ्याची संकल्पना मांडली होती. तेव्हा काँग्रेस सरकारने या प्रस्तावाला मंजुरात देऊन सर्वप्रथम या उपक्रमाची सुरुवात कोल्हापुरात सुरू केली. कोल्हापुरात या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळून मोठ्या प्रमाणात गावोगावी बंधारे बांधल्या गेले. त्यामुळे या बंधाऱ्याची ओळख कोल्हापुरी बंधारा म्हणून नावारूपास आली. कालांतराने या योजनेला व्यापक स्वरूप प्राप्त होऊन जलसंधारण योजनेतील महत्त्वाचा प्रकल्प ओळखल्या जाऊ लागला. कोल्हापुरी बंधारा प्रत्येक गावात बांधल्या जावा, अशी अपेक्षा रोजगार हमी योजनेचे तत्कालीन मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त करत या उपक्रमाचा समावेश रोजगार हमी योजनेत करून घेतला. कृषी विभाग लघुसिंचन विभागाच्या माध्यमातून २००१-२००५ या वर्षात संपूर्ण राज्यभर ३०१९ अधिक कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. कोल्हापुरी बंधाऱ्यावर कोट्यवधी रुपये खर्चिल्या गेले. मात्र, गेल्या दहा वर्षांच्या कालखंडात या बंधाऱ्याकडे कुणी ढुकूंनही पाहिले नाही.
दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवतो

जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवतो. यामुळे निश्चितच गावातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होऊ शकते.'' एकनाथ राजगुरू, कार्यकारीअभियंता, लघुसिंचन विभाग, जिल्हा परिषद, अकोला

डागडुजीची गरज
बंधाऱ्याची डागडुजी केल्यास लाखो लीटर पाणी थांबवता येऊ शकते. ज्यामुळे उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई दूर होऊ शकते. त्यामुळे बंधाऱ्यातून वाहणारे पाणी थांबवण्यासाठी लघुसिंचन विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

तर सुटू शकतो प्रश्न
बंधाऱ्यातीलपाणी थांबवण्यात प्रशासन अपयशी होत आहे. हे पाणी अडवले, तर किमान गावातील नागरिकांची तहान भागवल्या जाऊ शकते. पिण्याच्या पाण्यासाठी बंधाऱ्याचा उपयोग केल्यास किमान गावातील पाण्याचा प्रश्न तरी सूटू शकतो.