आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परिस्थितीशी दोन हात करत अश्विनीने घेतली भरारी; मजुराची मुलगी पोलिस भरतीत मुलींमध्ये आली दुसरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दुर्दम्य आत्मविश्वास, मनातला उत्साह, जिद्द, चिकाटी आणि प्रचंड इच्छाशक्ती, सकारात्मक वृत्ती असली की, माणूस असाध्य ते साध्य करू शकतो, याची साक्ष खडतर परिस्थितीशी झुंजणार्‍या अश्विनीने दाखवून दिले आहे. तिचे जीवन आणि परिस्थितीशी केलेला संघर्ष, तिच्यासारख्या शेकडो युवतींना प्रेरणादायी ठरणारा आहे. अकोल्यात नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीत खुल्या गटात मुलींमध्ये अश्विनी श्यामराव माने हिने गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे.

लोकमान्यनगर भागात श्यामराव माने या मजुराच्या घरी जन्मलेली अश्विनी बी.कॉम. अंतिम वर्षाला आहे. अभ्यासात जेमतेम असलेली अश्विनी तायकांदो व कराटे खेळात मात्र अनेकदा झळकली आहे. आतापर्यंत तायकांदो खेळात तीन राष्ट्रीय व चार राज्यस्तरांवरील तर कराटे स्पर्धेत तीन राष्ट्रीय पारितोषिकही तिने मिळवले आहे. अश्विनीचा भाऊ मूर्तिकार असला, तरी म्हणावे तेवढे उत्पन्न मिळत नसल्याने म्हातारपण आलेल्या वडिलांना मजुरी करावी लागते, याचे शल्य अश्विनीच्या मनाला बोचत होते. त्यामुळे हळव्या मनाच्या अश्विनीने आपण स्पर्धा परीक्षा देऊन नोकरीला लागू शकत नाही. मात्र, पोलिस भरतीत मात्र निश्चित यश मिळवू शकते, या आत्मविश्वासाने तिला झपाटले आणि तिचा पोलिस होण्याचा प्रवास सुरू झाला. दररोज खडतर मेहनत करीत तिने तयारी केली आणि नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीत 129 गुण मिळवून खुल्या गटात मुलींमध्ये ती दुसरी मेरिट आली. पोलिस भरतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अश्विनीला आनंदाश्रू आवरता आले नाही.

एका शायरने म्हटलेच आहे,
इरादे क्या कुछ नहीं कर सकते,
ये इरादे इन्सान को कामयाब बनाते है नाकामयाब भी बनाते है ये इरादे,
जज्बा है दिल मे अगर कुछ कर दिखाने का तो, पानी मे भी आग लगा देते है ये इरादे!
वेतन मिळणे सुरू झाल्याबरोबर बाबांचे काम बंद करणार
मी घरातली लहान, त्यामुळे अधिक काळ बाबांजवळ राहिली. बाबा म्हातारे झाले असतानाही त्यांना मजुरी करावी लागते, याचे मला वाईट वाटायचे. त्यामुळेच आपण नोकरी करू आणि बाबांची मजुरी बंद करू, त्यांना आराम देऊ, अशी जिद्द मी मनाशी बाळगून होते. आज पोलिस भरतीत मुलींमध्ये दुसरी आली. मला वेतन मिळणे सुरू झाल्याबरोबर मी माझ्या बाबांचे काम पूर्णत: बंद करणार. माझ्या जीवनाच्या वाटचालीत श्री रेणुका माता मित्र मंडळ तसेच उपमहापौर रफिक सिद्दीकी यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले, अशी प्रांजळ कबुली अश्विनीने दिली.