आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी आमदार ठरले खासदारावर ‘लय भारी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशीम - नुकत्याच झालेल्या वाशीम नगरपालिका अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे पूर्वाश्रमीचे माजी आमदार राजेंद्र पाटणी व विद्यमान शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. परंतु, पाटणी यांनी आपले राजकीय कसब पणाला लावत खासदार गवळी यांचे सर्व राजकीय डाव पार उलथवून टाकले. या निवडणुकीत पडद्याआड मोठ्या घडामोडी घडल्या, ज्यामध्ये खासदारांनी साम, दाम, दंड, भेद पणाला लावले. मात्र, यावर पाटणी यांनी राजकीय कौशल्याचा खुबीने वापर करत मात केली. या घडामोडींची शहरात जोरदार
चर्चा आहे.

वाशीम नगराध्यक्ष व उपाध्यक्षाची 14 जुलै रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीत सत्ता संपादन करण्यासाठी शहर विकास आघाडी व शिवसेना या दोन्ही गटांनी जोरदार तयारी केली होती. माजी आमदार पाटणी यांनी शहर विकास आघाडी स्थापन केल्यामुळे शिवसेनेने त्यांना नोव्हेंबर 2011 मध्ये पक्षातून निलंबित केले होते. त्यामुळे शहरात शिवसेना विरुद्ध पाटणीप्रणीत विकास आघाडी समोरासमोर उभे ठाकले होते. पाटणी यांच्या शहर विकास आघाडीवर पूर्ण विश्वास ठेवत नगरपालिकेमध्ये सर्वाधिक 12 असे संख्याबळ दिले. शिवसेनेचे आठ व एक पुरस्कृत असे नऊ उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादी काँगे्रसचे पाच तर काँग्रेसचा एक सदस्य निवडून आला होता. पाटणी यांनी जुन्या परिचयांचा उपयोग करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केली. अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाची पुन्हा निवडणूक लागल्यावर काहीही झाले तरी पाटणी यांची आघाडी सत्तेत येता कामा नये यासाठी शिवसेनेने कंबर कसली होती. यासाठी आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना गळी उतरवण्याचे प्रयत्न झाले, त्यामध्ये काही अंशी शिवसेनेला यशही मिळाले. नंतर शहर विकास आघाडीच्या काही सदस्यांच्या घरी विद्यमान खासदारांनी भेट देऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शिवसेनेसोबत आल्यास मोठी रक्कम देण्याचेही कबूल करण्यात आले. परंतु, प्रत्येक ठिकाणी खासदार आणि शिवसेनेच्या धुरिणांना ‘नन्नाचा’ पाढा ऐकावयास मिळाला. तेव्हा भाजपकडून येत्या निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक असणार्‍या नगरसेवकाला थेट ‘तुम्ही आता आमच्यासोबत आले नाही तर निवडणुकीत तुम्हाला शिवसेनाच पाडेल’, असा धमकीवजा इशारा देण्यात आला. परंतु, या धमकीलाही दाद न मिळाल्याने अखेर निराश झालेल्या खासदारांनी निवडणुकीच्या पूर्वरात्री सर्व प्रयत्न सोडून दिले. तर दुसरीकडे पाटणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना न बोलता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातूनच सदस्यांचे कान टोचून घेतले. त्यामुळे शिवसेनेच्या गळाला लागलेल्या काही सदस्यांनाही मन मारून आघाडीसोबत राहावे लागले. यामुळेच पुन्हा एकदा वाशीम पालिकेवर शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष झाले. याची चर्चा शहरात चांगलीच रंगू लागली आहे.
दिल्लीत अर्थसंकल्प, खासदार वाशीममध्ये :
सध्या केंद्रात अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे. वर्षातून एकदा होणार्‍या अर्थसंकल्पात आपल्या भागासाठी अधिकाधिक निधी मिळवण्यासाठी खासदारांचा आटापिटा असतो. परंतु, आपल्या अवाढव्य मतदारसंघापेक्षा पाटणी यांना तोंडघशी पाडण्यात खासदार भावना गवळी यांना अधिक रस होता. त्यामुळे महत्त्वाचे अर्थसंकल्प अधिवेशन सोडून त्यांनी ‘मुक्काम पोस्ट वाशीम’ ठेवले होते. इतके करूनही नगर परिषदेवर भगवा न फडकवू शकल्याने शेवटी खासदारांनी यातून काय हशील केले, असा प्रश्न निर्माण होत आहे. या निवडणुकच्या निकालाचा ह विधानसभा निवडणुकीवरही परिणाम होईल, अशीही चर्चा शहरवासीयांमध्ये आहे.