आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'एलसीबी' ठाण्यांना शरण, 4 किलो सोन्याच्या तपासात पोलिसांना अपयश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- सराफा व्यावसायिकांचे कुरिअरने मुंबईहून अकोल्यात आणलेले चार किलो सोन्याच्या तपासात पोलिसांना अपयश आले आहे. पाच महिने झाले, तरी एकाही आरोपीपर्यंत पोलिसांना अद्याप पोहोचता आले नाही. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. मात्र, या शाखेने आजपर्यंत एक ग्रॅम सोन्याचाही शोध लावला नाही. उलट आता पोलिस ठाण्यांना शरण येऊन त्यांनी आरोपीला शोधण्याचे आवाहन केले आहे.
पाच महिन्यांपूर्वी सोने चोरीची घटना घडली होती. रेल्वेच्या मार्गाने कुरिअरने चार लाख रुपयांचे सोने अकोल्यात आणले होते. सकाळच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी सोने असलेली पिशवी हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी रामदासपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या गुन्ह्याच्या टोकापर्यंत पोलिसांना पोहोचता आले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. मात्र, त्यांनी सराफा व्यावसायिकांचीच उलट तपासणी करून या प्रकरणावर एकप्रकारे पडदा टाकला. या आरोपींना पोलिसांना पकडता आले नाही.
घरफोडीचा तपास शून्य : दुर्गाचौकातील दुर्गेश नंदिनी अपार्टमेंटमधील एका व्यापाऱ्याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज २० जानेवारी २०१४ रोजी लंपास केला होता. औषधाचे ठोक विक्रेते असलेले चेतन अग्रवाल हे त्यांच्या कुटुंबासह चांदूर रेल्वे येथे गेले होते.
चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून बेडरूमच्या कपाटातून सोन्याच्या दोन बांगड्या, सोन्याचे नेकलेस, सोन्याची अंगठी आणि अडीच लाख, असा एकूण सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह चार लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास केला होता. मात्र, या तपासातही एलसीबीला अपयश आले आहे. याप्रकरणी एलसीबीने शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना पत्र पाठवून, आरोपीचा शोध घेण्याची याचना केली आहे.
वर्षभरापासून तपास नाही : सिव्हिललाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत मार्च २०१४ रोजी चोरी झाली होती. या वेळी अज्ञात आरोपीने सोन्याचे मंगळसूत्र १२० ग्रॅम, सोन्याचे मंगळसूत्र सहा ग्रॅम, सोन्याची साखळी १० ग्रॅम, सोन्याची अंगठी १५ ग्रॅम, सोन्याचे शिक्के ४५ ग्रॅम, दोन किलो चांदीच्या मूर्ती, असा दोन लाख ७० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. या प्रकरणाचा तपासही एलसीबीकडे आहे. मात्र, त्या तपासातही त्यांना यश आले नाही.
एलसीबी कशासाठी?
स्थानिक गुन्हे शाखेची वर्षभरापासून ठोस कारवाई नाही. तपासात एलसीबीची पीछेहाट झाली आहे. दुचाकी चोरीच्या तपासानंतर एकही मोठ्या गुन्ह्याचा तपास या शाखेने केला नाही. सोने चोरी, घरफोडी, कोषागारातील चोरी या मोठ्या प्रकरणात पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे एलसीबी कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.