आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Leopard News In Marathi, Environment, Forest Area, Divya Marathi, Buldhana

300 वर्षांपासून जंगलातील वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे बिबट्या बदलतोय आश्रयस्थाने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा - वनक्षेत्रातून थेट मानवी वस्तीत बिबट्या घुसण्याच्या अनेक घटना समोर येत असल्याने बिबट्या त्याच्या अधिवासात झालेल्या मानव प्राण्याच्या अतिक्रमणामुळे परिस्थितीनुरूप आश्रयस्थाने बदलत असल्याची माहिती समोर येत आहे. सुमारे 300 वर्षांपासून जंगलातील वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे बिबट्या बदलत्या परिस्थितीनुसार स्वत:ला ढाळण्याचे प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. दरम्यान, दिवसेंदिवस घटते वनक्षेत्र पाहता मानव प्राणी व वन्य श्वापदांमध्ये संघर्षाचे प्रसंग वाढत असून एकट्या बुलडाणा जिल्हय़ात गेल्या चार वर्षांत 82 व्यक्ती श्वापदांच्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. त्याच्या नुकसानभरपाईपोटी वनविभागाने आतापर्यंत 40 लाख 65 हजार सहा रुपयांची मदत जखमी तथा मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना केली आहे.


दुसरीकडे जिल्ह्यात एक हजार 166 चौरस किलोमीटर वनक्षेत्र असले तरी त्याची घनता कमी होत असल्याने वन्य श्वापद तथा बिबट्यांच्या आश्रयस्थानाला धक्का पोहोचत आहे. आज वर्तमान परिस्थितीत जिल्हय़ातील वनांची घनता ही 0.4 टक्क्यांच्या आसपास आहे. बिबट्यांना आश्रय घेण्यासाठी आवश्यक असलेली वनांची घनता तुलनेने कमी होत असल्याने ते नवनवीन आश्रयस्थाने शोधत आहेत. काळानुरूप तथा बदलल्या परिस्थितीनुसार आपल्या व्यवहारात व भक्ष्यांमध्ये प्रसंगी बिबटे बदल करू शकतात. परिणामी, वर्तमानकाळात बिबटे उसाच्या फडात, केळीच्या बागेत, नदी नाल्याकाठच्या दाट झाडीमध्ये प्रसंगी आश्रय घेत आहेत. त्यातूनच मानव व वन्यप्राण्यांमध्ये संघर्ष निर्माण होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात पाडळी, गिरडा, गुम्मी, धाड, मेहकर तालुक्यातील घाटबोरी, चिखली तालुक्यातील ढासाळा, अंचरवाडी, इसरूळ, मंगरुळ, खामगाव तालुक्यातील वरणा, निमकव्हळा, मांडणी, केंद्री, काळेगाव, मोताळा तालुक्यात धामणगाव बढे, नेहरूनगर परिसर वन्य श्वापदांच्या हल्ल्याच्या दृष्टीने संवेदनशील आहे. बुलडाणा शहरालगतच्या काही भागांचा यामध्ये समावेश आहे. जुन्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील वनक्षेत्रात 18 च्या जवळपास बिबटे, 65 च्या आसपास अस्वले व अन्य प्राणी असल्याचा अंदाज आहे. शहरांमध्ये वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.


नुकसानभरपाईमध्ये झाली मोठी वाढ
वन्य श्वापदांच्या हल्ल्यात गंभीर जखमी तथा मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना दिल्या जाणार्‍या नुकसानभरपाईमध्ये एप्रिल 2013 पासून वाढ करण्यात आली आहे. पूर्वी मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयास दोन लाख रुपये देण्यात येत होते, ती रक्कम वाढवून आता पाच लाख रुपये करण्यात आली आहे. गंभीर जखमींना पूर्वी 50 हजार रुपये मदत दिली जात होती, ती एप्रिल 2013 पासून एक लाख रुपये करण्यात आली आहे. दरम्यान, किरकोळ जखमी झालेल्यांना 7,500 रुपयेप्रमाणेच मदत मिळत होती. उपचाराचा आलेला खर्च व निर्धारित केलेली दोन्हीपैकी जी रक्कम कमी असेल ती मिळते.


पुढे वाचा पाण्‍यासाठी वन्य जीव वस्त्यांकडे.....