आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता चार दिवसच पाणी; निळोणा धरणात अत्यल्प जलसाठा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - गतवर्षी झालेल्या मुबलक पावसानंतरही प्राधिकरणाने कुठल्याही प्रकारचे नियोजन केले नाही. त्यामुळे आता शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. निळोणा धरणात केवळ चार दिवसांचा पाणीसाठा शिल्लक आहे, तर चापडोह प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असताना तांत्रिक अडचणी आल्यास पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यांपासून शहरातील काही भागांत पाण्याचा थेंबही पोहोचलेला नाही. त्यामुळे ही संकटाची चाहूल असल्याचे नागरिक बोलत आहेत.
यंदा मृग नक्षत्रात पावसाचे आगमन होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्यानंतर शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना उन्हासह पाण्याचे चटके सहन करण्याची वेळ आली आहे. यामुळे यवतमाळ शहरवासीयांच्या डोक्यावरील तणाव चांगलाच वाढला आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या निळोणा आणि चापडोह प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. आता शिल्लक पाणीसाठ्यावरच जीवन प्राधिकरण विभागाला समाधान मानावे लागणार आहे.

सध्याच्या परिस्थितीत शहरातील 29 हजार ग्राहकांसाठी दररोज 32 एमएलटी पाणीपुरवठा वितरित करण्यात येत आहे. दोन्ही धरणातून हा पाणीपुरवठा वितरित करण्यात येत असताना निळोणा धरणातून येणार्‍या पाइपमध्ये अचानक गाळ अडकला. ह्या गाळामुळे गेल्या आठवड्यापासून पाइपलाइन चोकअप झाली आणि पावसाळ्यातही शहरातील नागरिकांना पाण्याचा फटका सहन करण्याची वेळ आली. निळोणा प्रकल्पातील पाण्याची साठवणूक जवळपास 6.89 दलघमी एवढी असून, 6.39 दलघमी पाण्याचा वापर केल्या जातो. ही परिस्थिती असताना सध्याच्या परिस्थितीत केवळ चार दिवसांचा पाणीसाठा प्रकल्पात शिल्लक राहिलेला आहे. येत्या आठवड्याभरात पाऊस पडला नाही तर प्राधिकरणाला चापडोह येथून पाणी आणण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने पाइपलाइन, वीज, गाळ, चोकअप न होणे इत्यादी प्रकार झाल्यास ग्राहकांना पाण्यासाठी भटकंती करण्याशिवाय कुठलाच पर्याय राहणार नाही. एकंदरीत प्राधिकरणाने आणि नागरिकांनी आतापासूनच नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

चापडोहच्या अडचणी ठरणार डोकेदुखी :
चापडोह प्रकल्पात सध्या उपलब्धतेच्या 40 टक्के जलसाठा आहे. या प्रकल्पातील पाणी निळोणा प्रकल्पात वळवण्यात येणार आहे. त्यानंतर शहरातील गोधणी मार्गावरील टाकी, दर्डा नाका, पिंपळगाव, वाघापूर, आणि प्राधिकरणामधील दोन्ही टाक्यात पाणी सोडण्यात येणार आहे. या ठिकाणी पाणीसाठा जमल्यानंतर ग्राहकांना पाणी वितरित करण्यात येणार आहे. सध्या पाणी सांभाळून वापरण्याशिवाय कुठलाही पर्याय नागरिकांजवळ शिल्लक राहिलेला नाही. विशेष म्हणजे चापडोह प्रकल्पातून पाणी आणताना, तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांच्या नाकीनऊ येणार आहे.

नियोजनशून्यतेमुळेच पाणीटंचाई :
यंदाच्या उन्हाळ्यात शहरातील अनेक भागातील पाइपलाइनमध्ये गाळ अडकला. त्यात निळोणा धरणातून येणारी पाइपलाइनसुद्धा फुटली होती. या अडचणीतून तोडगा काढत प्राधिकरणाने शहरातील ग्राहकांना पाणीपुरवठा केला. उन्हाळ्यापूर्वीच पाणी वितरणाचे नियोजन केले असते, तर असा प्रकार घडला नसता.
गाळ केव्हा काढणार?
प्रशासनाचे वेळकाढू धोरण नागरिकांच्या त्रासाला कारणीभूत ठरत आहे. मागील वर्षी प्रशासनाने निळोणा धरणातील अत्यल्प गाळ काढला. या वर्षी तर सुरुवातही केली नाही. हे धरण गाळाने भरले आहे. नियोजन करून गाळ काढल्यास पाणी साठवण क्षमता वाढून नागरिकांना त्याचा फायदा होऊ शकतो. परंतु, हे काम करण्यासाठी पैसा तसेच वेळही नसल्याचे दिसून येते.
चार दिवस पुरेल एवढेच पाणी
४सध्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा होतो. त्यातही निळोणा प्रकल्पात पाण्याचा साठा अवघा चार दिवसांचा शिल्लक आहे. चापडोह प्रकल्पातून पाणी आणण्याची तयारी प्राधिकरणाने सुरू केली. शहरवासीयांना एक दिवसआड पाणीपुरवठा करणे अत्यावश्यक आहे. यासाठी लवकरच नियोजनासाठी बैठक बोलावण्यात येणार आहे.’’
दिनेश बोरकर, कार्यकारी अभियंता, जीवन प्राधिकरण, यवतमाळ.
पाण्यासाठी भटकंती
शहरातील काही भागातील पाणीपुरवठा गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ठप्प आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाइपलाइनमध्ये गाळ साचला आहे.