आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुन्हा पुढाकार घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहराच्या वैभवाचे कवित्व फक्त इतिहासात गडप होईल की काय, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. विकास सुधारणा आणि सुविधा सगळ्यांनाच पाहिजे आहेत. तशी सर्व स्तरांतून मागणीही आहे. त्या मिळाव्यात यासाठी पुढाकार घेण्याची त्यासाठी खिशात हात घालण्याची तयारीही अनेकजण दाखवतात. पण, दृष्ट लागलेल्या अकोला शहराची विस्कटलेली घडी कशी सुधारेल, याचे उत्तर कोणाकडेच नाही. आणि इतक्या वर्षांच्या मागणीनंतर खरंच काही सुधारणा होतील का, याबद्दल सर्वसामान्यांच्या अपेक्षाही तुटत चाललेल्या आहेत. प्रत्येक क्षेत्र आणि त्यात रखडलेल्या विकासाचे चित्र थोड्याफार फरकाने सारखेच आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनासारखा मानाचा कार्यक्रम कधीकाळी येथे झाला होता, यावर आजच्या शहराकडे पाहून विश्वास बसत नाही. ३३ वर्षांपूर्वी याच संमेलनात शहरात सांस्कृतिक सभागृह उभारावे, ही मागणी त्याचवेळी समोर आली, तेव्हापासून येथील नाट्य आणि सांस्कृतिक संस्था एका नाट्यगृहाच्या मागणीसाठी लढा देत आहेत. पण, लालफीतशाही आणि सकारात्मक विकासाच्या इच्छाशक्तीअभावी इतक्या वर्षांनंतरही सभागृहाचा प्रश्न आहे त्याच ठिकाणी आहे. सांस्कृतिक संस्थांनी या विषयाच्या निमित्ताने आलेली मरगळ झटकणे, अंतर्गत वाद बाजूला ठेवून एखादी परिपूर्ण कृती समिती नव्याने स्थापन करण्याची वेळ आता आली आहे. फक्त सभागृह हवे एवढीच मागणी करता ते कसे होऊ शकते, या पर्यायांसह लढा उभारला, आणि सकारात्मकपणे तो तडीस नेला, तर सांस्कृतिक सभागृहाचा प्रश्न मिटवण्यास फारसा वेळ लागणार नाही. शहर सुधारणांच्या दृष्टीने नागरी समस्या सुटाव्या, यासाठी दर सोमवारी वेगवेगळे विषय मांडत असताना ‘दिव्य मराठी’ने आज या विषयाला हात घातला आहे. सहभागातून समस्यामुक्तीसाठी नव्याने पुढाकार घ्या. आपले प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आपल्यासोबत आहोत.