आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरामध्ये धावताहेत विनापरवाना ऑटो रिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरातील कमी रुंदीचे रस्ते व वाढत्या खासगी वाहनांमुळे वाहतूक प्रणालीवर परिणाम होत आहे. या वाहनांमध्ये विनापरवाना धावणार्‍या ऑटो रिक्षांचे प्रमाण अधिक आहे. वाढत्या बेरोजगारीला पर्याय म्हणून अनेकांनी ऑटोरिक्षा चालवून रोजगार मिळवायला सुरुवात केल्याने शहरात ऑटो रिक्षांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, ऑटो रिक्षाचालक वाहतूक नियमांचे पालन करत नसल्याने मुख्य मार्गावर वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र नेहमी निदर्शनास येते. ऑटो रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक होत आहे. तसेच शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील ऑटो रिक्षांची गर्दीदेखील वाढत असल्याने वाहतुकीवर प्रभाव पडत आहे. यासर्व प्रकाराकडे वाहतूक शाखेच्या पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने विनापरवाना ऑटोधारकांच्या संख्येत वाढ होत आहे.
काय म्हणतो मोटार वाहन कायदा
शहरात विनापरवाना धावणार्‍या ऑटो रिक्षांवर मोटार वाहन कायदा 66 / 192 नुसार 2 हजार रुपये दंड ठोठावण्यात येऊ शकतो किंवा संबंधत वाहनावर जप्तीची कारवाई करून सदर वाहन एका महिण्याच्या कालावधीसाठी पोलिस ठाण्यात किंवा आरटीओ कार्यालयात उभी करण्यात येतात.

675 ऑटो रिक्षाचालकांना मिळणार परवाना
आरटीओ कार्यालयामार्फत शहरातील केवळ 2 हजार 847 ऑटोचालकांनाच परवान्यांचे वितरण करण्यात आले आहे, तर ऑनलाइन नोंदणी करण्यात आलेल्या नवीन ऑटो रिक्षाचालकांना 675 परवान्यांचे वितरण करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त शहरात धावणार्‍या ऑटो रिक्षा या विनापरवाना आहेत.

विनापरवाना ऑटो रिक्षांवर होणार कारवाई
शहरात विनापरवाना धावणार्‍या ऑटोरिक्षा तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आणि वाहतूक नियमांचे पालन न करणार्‍या ऑटो रिक्षांवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. ऑटोरिक्षा चालकांनीही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आपल्या रिक्षात बसवू नये. वाहतूकीच्या सर्व नियमांचे पालन करावे.’’ राजेंद्र वाढोकार, सह. प्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला.