आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Liquor Drinker Car Driver Hit Two Wheelar, Auto; Four Injured

मद्यधुंद कारचालकाची दुचाकी, ऑटोला धडक; चार जण गंभीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेगाव - मद्यधुंद कारचालकाने प्रथम मोटारसायकल व नंतर ऑटोला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तीन व ऑटोचालक, असे चार जण गंभीर जखमी झाले, तर ऑटोला धडक दिल्यानंतर इंडिगो कनारखेड फाट्यावर रस्त्याच्या खाली खड्डय़ात उतरली. ही विचित्र घटना रविवारी दुपारी 12 वाजता शेगाव-खामगाव मार्गावर घडली. सर्व जखमींवर येथील सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमोपचार करून अकोला येथे उपचारार्थ पाठवण्यात आले आहे, तर कारचालकाला शेगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंद नव्हता. कार हिंगोली मनसे तालुकाप्रमुखाची असल्याचे चालकाने सांगितले.
हिंगोली येथील कारचा (एमएच-37/ए-2692) चालक भरत नारायण शिंदे हा त्याच्या मालकाच्या पत्नीला घेऊन शेगाव येथे दर्शनासाठी आला होता. त्यांना दर्शनासाठी सोडून तो बारवर गेला. दर्शन घेऊन आल्यानंतर मालकीणबाईंना चालक शिंदे हा मद्यधुंद अवस्थेत आढळला. त्यांनी त्यांच्या पतीला फोन करून आपण बसने येत असल्याचे सांगितले. मालकाने शिंदे याला गाडी त्यांच्या नातेवाइकांकडे सोडण्यास सांगितले. चालक एकटाच गाडी घेऊन खामगावच्या दिशेने निघाला. त्याने प्रथम नवोदय विद्यालयासमोर मोटारसायकलला (एम. एच.-28- डब्ल्यू- 2456) मागून जोरदार धडक दिली. दुचाकीवरील दीपक प्रभाकर गर्गे (39), त्यांची पत्नी दीपाली व 5 वर्षांचा मुलगा दिपांकन (रा. लक्ष्मीनगर, बुलडाणा) हे गंभीर जखमी झाले. तेथे गाडी न थांबवताच भारत शिंदेने गाडी अधिका वेगाने दामटून माउली अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर ऑटोला धडक दिली. ऑटो उलटून ऑटोचालक लक्ष्मण अमोल धस (रा. खामगाव) हे जखमी झाले. पुढे कारचालकाचे कनारखेड फाट्यावर नियंत्रण सुटले व गाडी एका खड्डय़ात गेली. लोकांनी कारचालकाला पकडून चांगलाच चोप दिला व शेगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. सर्व जखमींना शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार करून त्यांना अकोला येथे उपचारासाठी हलवले आहे.