आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्य निर्माता राजू जयस्वालचा जामीन अटींसह मंजूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अवैध स्पिरिट जप्ती प्रकरणात अटकेत असलेला मद्य निर्माता व सेव्हन स्टार कंपनीचा मालक राजू जयस्वाल व त्याचा सहकारी अभय नंद यांचा जामीन अर्ज मूर्तिजापूर येथील न्यायालयाने अटींसह मंजूर केला. या प्रकरणात गेल्या चार दिवसांपासून हे दोघे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिस कोठडीत होते. आज त्यांना मूर्तिजापूर न्यायालयात हजर केले असता, तपास अधिकार्‍याने तपास पूर्ण झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा आदेश देण्यात आला. दरम्यान, जयस्वालच्या वकिलांनी जामीन मंजूर करण्याचा अर्ज दाखल केल्यानंतर तो मंजूर करण्यात आला, अशी माहिती मिळाली आहे.


इंदूर येथून आलेले 14 हजार लिटर अवैध स्पिरिट राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने 25 डिसेंबर 2013 रोजी जप्त केले होते. या प्रकरणात स्पिरिटसह टँकर व ते सोडवण्यासाठी आलेले डस्टर वाहन जप्त केले गेले होते. 25 डिसेंबरला झालेल्या मोबाइल संवादामुळे या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार राजू जयस्वाल असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने स्पष्ट केले. पण, त्यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता व चौकशी करत त्यांच्यावर कारवाईचे फास आवळले. हे करताना त्याला दोन वेळा नोटीस देत संधी देण्यात आली. अखेर त्याला शुक्रवार, 7 फेब्रुवारीला अटक केली. या प्रकरणात 25 डिसेंबरला गजानन पुंडलिक मेहसरे, अविनाश रामभाऊ पाटील, टँकरचालक इम्रान युसूफ बेग यांना अटक झाली होती.


या सर्व प्रकरणात शासनाचा काही कोटींचा महसूल बुडवल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणात सरकारतर्फे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक दिगंबर शेवाळे व अँड. व्ही. व्ही. दामले यांनी, तर राजू जयस्वालतर्फे अँड. बी. के. गांधी, अँड. उल्हास कविश्वर, अँड. सुनील कांबे यांनी काम पाहिले. अशी माहिती सूत्रांनी दिली.