अकोला - साहित्यसंमेलनाचे अनेक प्रवाह आहेत. भाषा, चळवळ, प्रांतनिहाय संमेलनाचे आयोजन होते. मात्र, राष्ट्रसंतांचे विचार साहित्य संमेलन हे सर्व विचारांचा सार आहे. मात्र, यापुढे केवळ विचार साहित्य संमेलनाचे आयोजन होता त्याचे कृती संमेलनात रूपांतर व्हावे, अशी सार्थ अपेक्षा संमेलनाध्यक्ष आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांनी व्यक्त केली.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने स्वराज्य भवनाच्या प्रांगणात १२ डिसेंबरपासून सुरू असलेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाची १४ डिसेंबरला सायंकाळी ला सांगता झाली. या समारोपीय सत्रात ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. गजानन नारे, माजी मंत्री सुधाकरराव गणगणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मुकुटराव बेले, नगरसेवक जयंत मसने, महादेवराव हुरपडे, आमले महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी आयोजन समितीच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर माजी मंत्री सुधाकर गणगणे यांनी विचार मांडले. ते म्हणाले की, तीन दिवसीय विचार संमेलनात राज्यभरातील विचारवंतांनी विविध विषयांवर ऊहापोह केला. या संमेलनातील विचारांची शिदोरी घेऊन आयुष्याचा पुढील खडतर प्रवास केल्यास तो सुखकर होईल, तर संमेलनाध्यक्ष आचार्य वेरुळकर यांनी ज्या साहित्य संमेलनातून समाज सुसंस्कृत होत नसेल, जे साहित्य संमेलन समाजाला कार्यप्रवण करत नसेल, समाजातील समस्यांशी लढण्याची ताकद देत नसेल त्यांचे आयोजन निरर्थक आहे. राष्ट्रसंतांचा विचार सर्वव्यापी, सर्वसमावेशक आहे. राष्ट्रसंतांच्या विचारपीठावर सर्वधर्मसमभाव आहे. सर्व धर्मांच्याविचाराचा काढा म्हणजे ग्रामगीता आहे. त्यामुळे या विचारांवर आधारित साहित्य संमेलनाला कृती संमेलनाची जोड द्यावी, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.
सत्यपाल महाराजांच्या सत्यवाणीतून प्रबोधन
समारोपीयसत्रानंतर सप्तखंजिरीवादक तथा ग्रामगीता तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ प्रचारक सत्यपाल यांची सत्यवाणी कडाडली. त्यांनी
आपल्या नेहमीच्या शैलीतून सामाजिक विषयांवर प्रबोधन केले. बुवाबाजी, अंधश्रद्धा, सामाजिक समस्यांवर त्यांनी आसूड ओढले. त्यांचेसोबत सप्तखंजिरीवादक संदीपपाल, अक्षयपाल, रामपाल यांनीही प्रबोधन केले. कार्यक्रमास अकोलेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान दिवसभर झालेल्या विविध सत्रांना मान्यवरांची उपस्थिती हाेती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजीव बोरकर यांनी केले. राजेंद्र झामरे यांनी आभार मानले. त्यानंतर संमेलनाच्या आयोजनासाठी वििवध समित्या, सेवाकार्यातून मदत करणाऱ्या गुरुदेवप्रेमींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सर्वसंत स्मृती दिन तथा सर्वधर्मीय प्रार्थना : समारोपीयसत्रापूर्वी सर्व संत स्मृती दिन सर्वधर्मीय प्रार्थना झाली. त्याला गुरुदेवप्रेमी पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रार्थना विजय वाहोकार, श्रीकृष्ण पखाले संचाने सादर केली.