आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परजिल्ह्यातून येते रोज 80 हजार लिटर दूध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पशुधनाची घटती संख्या आणि वाढत्या तापमानाचा परिणाम दुधाच्या उत्पादनावरही होत असून, अकोला जिल्ह्याला दुधासाठी परजिल्ह्यावर अवलंबून राहावे लागत आहे. शहरवासीयांची गरज भागवण्यासाठी जवळपास 80 हजार लिटर दूध परजिल्ह्यातून मागवण्यात येत आहे. वध्र्यासारख्या 200 कि.मी. अंतरावर असलेल्या जिल्ह्यातूनही 10 हजार लिटर दुधाचा पुरवठा येथे होत आहे.
अकोल्यातील एकाही घराला दुधाची गरज भासणार नाही, असे उदाहरण शोधूनही सापडणार नाही. प्रत्येक घरात चहासाठी अथवा मुलांसाठी दूध हे आवश्यकच असते. साधारण एका व्यक्तीला 150 मिलिलिटर दुधाची आवश्यकता असते. यानुषंगाने साधारणत: 2 लाख 70 हजार लिटर दुधाची निकड जिल्ह्याला गरज भासते. येथील शासकीय दूध डेअरीमध्ये जिल्हा दूध संघामार्फत दररोज केवळ 1500 लिटर दुधाचे उत्पादन होत असून, हे उत्पादन गरजेपेक्षा खूपच कमी आहे. स्थानिक दूध उत्पादकांमार्फ त जवळपास 1 लाख 88 हजार 500 लिटर दुधाचे दररोज उत्पादन करण्यात येते. स्थानिक दूध उत्पादक तसेच शासकीय दूध डेअरीमार्फत होत असलेल्या दूध उत्पादनात लोकसंख्येच्या जवळपास 30 टक्के दुधाची कमतरता जाणवते.

हा फरक भरून काढण्यासाठी शेजारील जिल्ह्यातून विकास, अमर, राजहंस यासारख्या कंपनीचे पाकीट बंद 80 हजार लिटर दुधाची आयात करण्यात येत आहे. शहरात खासगी दूध विक्रेत्यांकडून खुले दूध 40 रुपये प्रती लिटर तर पाकीट बंद दुधाची विक्री 30 रुपये प्रती लिटर याप्रमाणे होत आहे. परंतु, येथील पशुधन कमी असल्याने तसेच जिल्हा दूध उत्पादन संघामार्फत आवश्यक तेवढे दुधाचे संकलन करण्यात येत नसल्याने शासकीय दूध डेअरीमध्ये गरजेएवढे दुधाचे संकलन होत नाही.