आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन परीक्षेच्या काळात फटका भारनियमनाचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - राज्यात एक हजार 600 मेगावॉट विजेची तूट निर्माण झाल्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात नागरिकांना तात्पुरत्या भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. अकोला शहरात गरजेनुसार एक ते दोन तासाचे तात्पुरते भारनियमन करण्यात येत असल्याची माहिती महावितरणच्या अधिकार्‍यांनी दिली.

केंद्रीय विद्युत यंत्रणेतील सिपत-बिलासपूर वाहिनीच्या दुरुस्तीमुळे सुमारे 350 ते 500 मेगावॉट वीज मिळणे कमी झाले आहे. शिवाय अदानी विद्युत प्रकल्पातील 660 मेगावॉटचे दोन संच तांत्रिक कारणांमुळे अचानकपणे बंद पडले आहेत. परिणामी, राज्यात सुमारे एक हजार 600 मेगावॉटची तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे अचानक तात्पुरत्या भारनियमनाला सुरुवात झाली आहे. संच दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, उद्यापर्यंत हे संच पूर्ववत सुरू होतील, अशी अपेक्षा महावितरणच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील विजेची मागणी डिसेंबर 2012 पासून सातत्याने वाढत आहे. त्यातच आता संच बंद झाल्यामुळे विजेचा तुटवडा निर्माण झाला.

राज्यातील या तात्पुरत्या भारनियमनाचा फटका शहरातील जनतेला सहन करावा लागत आहे. शहरात महावितरणकडून एकूण 39 फीडर्सवर वीजपुरवठा केला जातो. त्यापैकी शहरातील 33 फीडर्स भारनियमन मुक्त आहेत. 42 टक्क्यांपेक्षा अधिक वीज हानी असलेल्या सहा फीडर्सवर भारनियमन करण्यात येत आहे.

ए ते डीपर्यंतचे फीडर्स भारनियमन मुक्त आहेत. राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने आता भारनियमनमुक्त फीडर्सवरही एक ते दोन तासाचे भारनियमन केले जात आहे. तुटवडा कमी होताच या फीडर्सवरील भारनियमन बंद करण्यात येईल, अशी माहिती महावितरणच्या अधिकार्‍यांनी दिली.

लवकरच विजेचा तुटवडा दूर होईल
विजेचा तुटवडा असल्याने भारनियमनमुक्त फीडर्सवर गरजेनुसार एक ते दोन तासाचे भारनियमन करण्यात येत आहे. लवकरच विजेचा तुटवडा दूर होईल. त्यानंतर तात्पुरते भारनियमन करण्याची गरज राहणार नाही. धम्रेश मानकर, कार्यकारी अभियंता, महावितरण, अकोला.