अकोला- लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्या आदेशान्वये जिल्हा निवडणूक विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व पदाधिकार्यांना वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बुधवार 5 मार्चला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली. मतदारांवर प्रभाव पडेल अशा कुठल्याही गोष्टींना आचारसंहितेत बंधने येतात. त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषदा आणि जिल्हा उपनिबंधकाच्या पदाधिकार्यांची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळपर्यंत जमा करण्याचे आदेश निवडणूक विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला, आयुक्त महानगरपालिका अकोला, जिल्हा उपनिबंधक कार्यालय अकोला या अधिकार्यांना लेखी स्वरूपात दिले आहेत.
राजकीय पदाधिकार्यांची आज बैठक
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक ती माहिती देण्याकरिता जिल्हा निवडणूक विभागाने गुरुवारी 6 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती सभागृहात बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
सूचना देण्यासाठी बैठक
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना देण्याकरिता गुरुवार, 6 मार्चला तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांना तसेच निवडणूक निर्णय अधिकार्यांना आमंत्रित केले आहे.’’ अरुण शिंदे, जिल्हाधिकारी, अकोला.