अकोला- काँग्रेसने अकोला लोकसभा मतदारसंघाची तयारी पूर्ण केली आहे. पक्षाच्या यासंदर्भात बैठका होत असून, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. येत्या 5 ते 6 मार्च रोजी पक्षाच्या उमेदवाराचे नाव प्रदेश पातळीवर निश्चित होईल’, अशी माहिती पक्षनिरीक्षक अरुण मुगदिया यांनी शुक्रवारी दिली.
अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष भारिप-बमसंसोबत आघाडी करतो की नाही, याविषयी गेल्या काळात बरीच चर्चा झाली. पण, अद्याप कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे काँग्रेसनेदेखील उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान, अकोला दौर्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी तसे संकेतदेखील दिले होते. जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, नातिकोद्दीन खतीब यांना उमेदवारी देऊ शकतो, असे संकेत देत त्यांनी काँग्रेसने तयारी सुरू केल्याचे स्पष्ट केले होते. भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले माजी आमदार नारायण गव्हाणकर, जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, नातिकोद्दीन खतीब, अजहर हुसेन यांच्यापैकी एकाला उमेदवारी देण्याची शक्यता पक्षातील सूत्रांनी व्यक्त केली. पक्ष तरुणांना प्राधान्य देऊ शकते. त्यामुळे अनपेक्षितपणे पक्षाचा उमेदवार घोषित होऊ शकतो. पक्षपातळीवर याबाबत चर्चा होत असून, अद्याप उमेदवारी जाहीर न झाल्याने पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
तो ठराव महत्त्वाचा : पक्षाच्या जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीने प्रदेश स्तरावर लोकसभा निवडणुकीसंदर्भातील हक्क प्रदान केले आहे. त्यामुळे प्रदेश पातळीवर यासंदर्भातील निर्णय होईल.
राहुल गांधींचा दौरा निश्चित : राहुल गांधी यांच्या 5 व 6 मार्चच्या दौर्यात राज्यातील लोकसभा उमेदवार निश्चित होतील. या दौर्यात राहुल गांधी औरंगाबाद व धुळे जिल्हय़ातील शिरपूर येथे जाणार आहेत. या दौर्यात अकोल्यातील उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.