आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election, Latest News In Divya Marathi

शिवणी विमानतळावर भाजपकडून ‘मोदी गुलाला’चे लाँचिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- कुठल्याही शासकीय कार्यालयात राजकीय पक्षांना कोणताही कार्यक्रम करता येत नाही, पण भाजपने शुक्रवारी शिवणी विमानतळाच्या प्रतीक्षालयात मोदी गुलालाचे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत लाँचिंग केले. या वेळी उपस्थितांना गुलालाच्या पाकीटचे वाटप करण्यात आले. या सर्व प्रकाराने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग झाल्याची चर्चा घटनास्थळी होती.
याप्रकरणी जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी काय कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अमरावती येथील महायुतीच्या सभेला जाण्यासाठी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे आणि विनोद तावडे अकोला येथे विमानाने आले होते. त्यांना येण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा अधिक उशीर झाला. यादरम्यान विमानतळाच्या प्रतीक्षागृहात बसलेले खासदार संजय धोत्रे, आमदार पांडुरंग फुंडकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार हरीश पिंपळे, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते हरीश आलिमचंदानी, डॉ. जगन्नाथ ढोणे यांच्या उपस्थितीत मोदी गुलालाच्या पाकीटचे लाँचिंग करण्यात आले. त्यानंतर या वेळी उपस्थितांना गुलालाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले.
काय म्हणतो कायदा..
निवडणूक आचारसंहितेच्या काळामध्ये कोणत्याही सरकारी कार्यालयात राजकीय पक्षांद्वारे पक्षाचा कुठलाही अजेंडा राबवता येत नाही. यासोबतच कुठलीही सार्वजनिक बैठक घेता येत नाही तसेच निवडणुकी संदर्भातील कुठलाही प्रचार, प्रसिद्धी करता येत नाही.
विमानतळावर गुलालाचे वाटप नाही
शिवणी विमानतळावर शुक्रवारी मोदी फॅन क्लबच्या पदाधिकार्‍यांनी गुलाल आणला होता. तो गुलाल त्यांनी तिथे भाजपच्या नेत्यांना दिला. मात्र त्याठिकाणी कुठेही गुलालाचे वाटप करण्यात आले नाही. त्यांनी त्या गुलालाचे गावामध्ये वितरण केले.’’ गिरीश जोशी, प्रसिद्धिप्रमुख, भाजप.
संबंधिताकडून घेतो माहिती
शिवणी विमानतळावर शुक्रवारी झालेल्या प्रकाराची संबधितांकडून माहिती घेण्यात येईल. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग झालेला असल्यास त्यासंदर्भात माहिती घेऊन निश्चित कारवाई केली जाईल.’’ शिवाजी दिवेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अकोला.
अकोल्यातील शिवणी विमानतळावर शुक्रवारी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मोदी गुलालाचे लाँचिंग करण्यात आले.