आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election, Latest News In Divya Marathi

गव्हाणकरांच्या उमेदवारीने संभ्रमाचे वातावरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- लोकसभा निवडणूक लढण्याच्या घोषणेबरोबरच उमेदवारी अर्ज दाखल करुन नारायण गव्हाणकर यांनी उडवलेली खळबळ किती काळ टिकणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. निवडणुकीत कायम राहायचे की नाही, याचा अंतिम निर्णय उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी 26 मार्चला घेण्याची घोषणा गव्हाणकर यांनी केली आहे. त्यामुळे गव्हाणकर शेवटी माघार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी बाळापूरचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी आज, 18 मार्च रोजी दुपारी 3 वाजता 3 नामनिर्देशन पत्रे दाखल केली.यात एक अर्ज कॉंग्रेस उमेदवार म्हणून तर दोन अर्ज अपक्ष म्हणून सादर केले. कॉंग्रेसने जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांना उमेदवारी घोषित केली. असली तरी ए.बी. फॉर्म मलाच मिळेल,असा विश्वास गव्हाणकर यांनी व्यक्त केला. याबाबत पक्षर्शेष्ठी लवकरच निर्णय देतील,असे त्यांनी सांगितले.
भाजपला रामराम करुन नारायण गव्हाणकर यांनी 21 सप्टेंबर 2013 रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेशाबाबत आग्रह केला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांना उमेदवारी घोषित केली. तरीही गव्हाणकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा केली होती त्यानुसार आज दुपारी 3 वाजता आपल्या कार्यकर्त्यांसोबत नारायण गव्हाणकर यांनी जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांकडे आज तीन उमेदवारी अर्ज दाखल केले. यापैकी एका अर्जावर कॉंग्रेसचा तर उर्वरित दोन अर्जांवर अपक्ष म्हणून उल्लेख आहे. दरम्यान निवडणूक लढवायची की माघार घ्यायची, याचा निर्णय 26 मार्चला होईल,असे ते म्हणाले. मध्यवर्ती बसस्थानकाजवळील स्वराज्य भवनपासून मिरवणूक काढून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्तिप्रदर्शन केले. यामध्ये गव्हाणकर यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते सहभागी झालेले दिसून आले. त्यात विठ्ठलराव लोथे, रवी अग्रवाल, विनोद रोकडे, गजानन नेव्हाल, मोहन जोशी, डॉ. नवीन तिरूख, माजी सभापती बेलुरकर, माजी सभापती जयाताई गावंडे, कवळकार, फाळके, पंचायत समिती सदस्य विजू ठाकरे, संतोष गव्हाळे, राजेश हरणे, दीपक हरणे, प्रवीण हेलगे, हरीश बुंदेले आदी कार्यकर्ते सोबत होते.
माध्यम प्रतिनिधींना केला मज्जाव : नारायण गव्हाणकर उमेदवारी अर्ज दाखल करायला गेले तेव्हा त्यांच्यासोबत प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी होते. जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना मज्जाव करत बाहेर जाण्यास सांगितले. दरम्यान काही वेळाने जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकार्‍यांसोबत माध्यम प्रतिनिधींची चर्चा घडवून आणली. त्यानंतर जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या प्रवेशाबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी परवानगी मागतो, असे सांगितले.
घाईघाईत अर्ज विसरले : घाईगडबडीत नारायणराव गव्हाणकर जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांकडे रिकाम्या हाताने गेले. अर्ज सादर करण्यासाठी खुर्चीवर बसले तेव्हा आपल्या हातात अर्ज नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. शेवटी कार्यकर्त्यामार्फत उमेदवारी अर्ज बोलावण्यात आला. या प्रकाराने अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया काही वेळ खोळंबली होती.
आचारसंहितेचा भंग, गव्हाणकरांविरुद्ध गुन्हा
मंगळवार, 18 मार्च रोजी नारायण गव्हाणकर हे शंभर ते दीडशे कार्यकर्ते ढोलताशांसह मिरवणुकीने लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोणतीही परवानगी न घेता जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आले. त्यावरून जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) (3) मुंबई पोलिस कायदा आदेशाचे उल्लंघन केले. त्यावरून शहर कोतवाली पोलिस ठाण्यात त्यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध कलम 135 मुपोका. सहकलम 188 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शहर कोतवाली पोलिस करत आहेत. या घटनेच्या अनुषंगाने नायब तहसीलदार, पथकप्रमुख (व्हिडिओ, व्हिव्हिंग चमू) जिल्हाधिकारी, कार्यालयातर्फे शहर कोतवालीचे ठाणेदार यांनी नारायण गव्हाणकर यांच्याविरुद्ध गैरकायदेशीर जमाव करून शासकीय इमारती व परिसरात राजकीय पक्षाचे चिन्ह वापरून घोषणाबाजी करणे व इतर अनुषंगिक बाबींबाबत गुन्हा दाखल करावा, चलचित्र फितीमध्ये आढळलेल्या अनियमिततेबाबत आदर्श आचारसंहिता व लोकप्रतिनिधी तरतुदीच्या अनुषंगानेही गुन्हा दाखल करावा, असे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनानुसार चौकशीअंती नारायण गव्हाणकर व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयाने कळवली आहे.
कोण केव्हा भरणार अर्ज?
हिदायत पटेल (काँग्रेस ) 20 मार्च सकाळी 11 वाजता स्वराज्य भवन येथून निघणार.
संजय धोत्रे (भाजप) शुक्रवार, 21 मार्च सकाळी 11 वाजता भाजप कार्यालयातून निघणार.
रिसोड विधानसभा ठरणार निर्णायक :
रिसोड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लोकसभा निवडणुकीसोबत आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे प्राबल्य होते. त्यामुळे येथे कुणाला जनतेचा कौल मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. हा विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असल्याने त्याकडे कुणीही दुर्लक्ष करू शकत नाही.
काँग्रेसचे इच्छुक कुणासोबत :
अकोला पूर्व व पश्चिम, बाळापूर, अकोट या विधानसभा मतदारसंघात काँग्रेससाठी कोण काम करतात, याकडे पक्षाचे लक्ष राहणार आहे. या मतदारसंघात पक्षाचे निष्ठावान कोण व ते किती मतदारांना पक्षाकडे खेचू शकतात, या त्यांच्या क्षमतेचा विचार भविष्यात होणार आहे. त्यामुळे लोकसभेतील त्यांच्या मेहनतीवर विधानसभेच्या त्यांच्या दावेदारीवर पक्ष विचार करेल, असे मत काँग्रेसच्या ज्येष्ठांनी व्यक्त केले.