आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Akola, Vidarbh, Voting

सरासरी 65 टक्के मतदारांनी बजावला हक्क

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - लोकसभेसाठी 10 एप्रिलला निवडणूक शांततेत झाली. मात्र, उमेदवार याद्यांमध्ये झालेल्या घोळामुळे मतदारांना धावपळ करावी लागली, ती सायंकाळपर्यंत कायम होती. निवडणुकीत सात उमेदवारांचे नशीब इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात सीलबंद झाले आहे.
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये सरासरी 65 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीत झालेल्या 49 टक्के मतदानाच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत मतदानात वाढ झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील 1,774 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले असून, भानुदास कांबळे (बसप), संजय धोत्रे (भाजप), हिदायत पटेल (काँग्रेस), अजय हिंगणकर (आप), अँड. प्रकाश आंबेडकर (भारिप-बमसं), शेख हमीद इमाम (बहुजन मुक्ती पार्टी), संदीप वानखेडे (अपक्ष) या सात उमेदवारांचे नशीब इलेक्ट्रॅानिक यंत्रात सीलबंद झाले. सकाळी 7 ते सायंकाळी 6 दरम्यान सहा विधानसभा मतदारसंघात सरासरी 65 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी उदय राजपूत यांनी दिली. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतदानाची उर्वरित. पान 4
टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे अनेक उपक्रम राबवण्यात आले, त्यामुळे मतदान काही प्रमाणात वाढलेले दिसून आले. मात्र, वेळेवर मतदानाच्या चिठ्ठय़ा (पोल चिट्स) न मिळाल्याने अनेकांची तारांबळ उडालेली दिसून आली. यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदारांना यापूर्वी निरनिराळया एजन्सीमार्फत स्लिप वाटपाची सुविधा अवलंबण्यात येत होती. ती सुविधा शासनाने अवलंबलेल्या धोरणाने राबवता आली नाही. त्यामुळे अनेक मतदारांना आपला मतदान क्रमांक व केंद्र क्रमांक मिळाला नाही. उन्हाळ्यात पुरेशा पाण्याची व्यवस्थाही मतदान केंद्राच्या ठिकाणी आढळली नाही. याशिवाय बर्‍याच मतदान केंद्रांवर पुरेशी विद्युत व्यवस्था नसल्याने ईव्हीएमवरील नावे व चिन्हे स्पष्ट दिसत नव्हती. काही मतदान केंद्रांवरील मतदात्यांची मागील पाच वर्षांपूर्वी ज्या मतदारसंघात नावे होती त्यांची नावे त्यांनी कोणताही अर्ज न भरता वगळल्याचे दिसून आले. त्यामुळे हे मतदार मतदानापासून वंचित राहिले. त्यामुळे शासनाच्या 100 टक्के मतदान या संकल्पनेला एकप्रकारे तिलांजलीच मिळाली, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
नियंत्रण कक्षाद्वारे लक्ष
निवडणूकविषयक कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) तयार केली होती. या ठिकाणी जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी अरुण शिंदे व जिल्हा पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिर्श हे कंट्रोल रूमद्वारे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. वेब कॅमेर्‍यांद्वारे आढळलेल्या त्रुट्या तत्काळ अधिकार्‍यांच्या लक्षात आणून त्या सोडवण्यासाठी आदेशित करण्यात येत होते.
उमेदवारांचे नशीब सीलबंद
जिल्हा पोलिस दलातील एक जिल्हा पोलिस अधीक्षक, एक अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक, चार पोलिस उपअधीक्षक, 16 पोलिस निरीक्षक, 71 पोलिस उपनिरीक्षक आणि 1 हजार 500 कर्मचारी, 400 पुरुष होमगार्ड्स आणि 100 महिला होमगार्ड्स तैनात केले होते. याशिवाय बाहेर जिल्ह्यातील चार पोलिस उपअधीक्षक, 66 एपीआय, 66 पोलिस कर्मचारी, 100 महिला पोलिस कर्मचारी, परभणी येथील 400 गृहरक्षक दलाचे जवान (होमगार्ड्स), दिल्ली येथील रेल्वे सुरक्षा दल आणि पुण्याच्या एसआरपीच्या दोन-दोन तुकड्या बंदोबस्तात तैनात होत्या.