आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Vidarbh, Voting, Divya Marathi

विदर्भात प्रचारतोफा थंडावल्या,उद्या मतदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - विदर्भात लोकसभा निवडणुकीची गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी, 8 एप्रिलला संपली. विदर्भातील 10 मतदारसंघांत गुरुवार, 10 एप्रिलला मतदान होणार असून त्यासाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे.


अकोला मतदारसंघात निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून सहा मतदारसंघाअंतर्गत 1774 मतदान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. निवडणुकीची सर्व तयारी झाली असून बुधवार 9 एप्रिल रोजी केंद्राधिकारी मतदान केंद्रांवर ईव्हीएम घेवून रवाना होणार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी अरूण शिंदे यांनी दिली.या मतदारसंघात 16 लक्ष 74 हजार 456 मतदार आहेत. जिल्ह्यात 131 संवेदनशील मतदान केंद्र व 27 अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. कोणत्याही मतदान केंद्रांवर अनुचित प्रकार घडणार नाही याकरिता जिल्हा प्रशासनाने पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान प्रक्रिया खंडित होऊ नये म्हणून ईसीआयएल हैद्राबाद येथून दोन तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे.


बुलडाणा : बुलडाणा मतदारसंघांत 15 लाख 86 हजार 192 मतदार असून, मतदानासाठी 1718 मतदान केंद्र सज्ज आहेत. एकूण 17 उमेदवार रिंगणात असून आचारसंहिता भंगाच्या 22 तक्रारी झालेल्या आहेत. मतदारसंघात पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.


अमरावती मतदारसंघ : अमरावती लोकसभा मतदारसंघात 16 लाख 10 हजार 712 मतदार असून 1800 मतदान केंद्र सज्ज झाले आहेत. दुर्गम भागात पोलिंग पार्टीज आज दुपारीच रवाना झाल्या. या मतदारसंघात 19 उमेदवार आहेत, परंतु लढत चौरंगी होत आहे.


यवतमाळ-वाशिम : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघांमध्ये 2009 मतदान केंद्र असून निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित व्हावी यासाठी 13006 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मतदारसंघात 26 उमेदवार रिंगणात आहेत. प्रमुख लढत काँग्रेस आणि महायुतीच्या उमेदवारात होईल. मनसेनेदेखील येथे उमेदवार उभा केलेला आहे. जानेवारी 2014 पर्यंत मतदारसंघात 17 लाख 15 हजार 592 मतदार आहेत.


नागपूर : एकूण मतदार : 18,99,395, एकूण मतदान केंद्र 1828 आहेत, तर रामटेक मतदारसंघात 16,75,415 मतदार असून एकूण 2231 मतदान केंद्र आहेत. रामटेकमध्ये 10 आणि नागपूरमध्ये 9, अशी 19 अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहे, तर रामटेकमध्ये 47 आणि नागपूरमध्ये 61 ,अशी 108 संवेदनशील मतदान केंद्र आहे. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघांत आचारसंहिता भंगाच्या प्रत्येकी 3 अशा एकूण 6 तक्रारी प्राप्त झाल्या.
भंडारा-गोंदिया मतदारसंघ : एकूण मतदार : 16 लाख 40 हजार 523 असून
2079 मतदान केंद्र आहेत. 26 उमेदवार रिंगणात आहेत. संवेदनशील मतदारसंघ 31 तर अतिसंवेदनशील मतदारसंघ 6 आहेत.
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांत 17 लाख 50 हजार 581 मतदार असून, 1986 मतदान केंद्रांवर मतदान होईल. यासाठी 19 हजार 100 अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. 545 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी 3 हजार 670 कर्मचारी तैनात राहतील. या मतदारसंघात एकूण 18 उमेदवार लढतीत असून, प्रमुख लढत काँग्रेस, भाजप आणि आपच्या उमेदवारांमध्येच आहे.
गडचिरोली-चिमूर : गडचिरोली - चिमूर लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातून 14 लाख 68 हजार 979 मतदार असून, 11 उमेदवार रिंगणात आहेत. 1794 मतदान केंद्रांमधून मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी अधिकारी, कर्मचार्‍यांचीही नियुक्ती करण्यात आली असून, पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
वर्धेत यंत्रणा सज्ज : वर्धा लोकसभा मतदारसंघात 1892 मतदान कें द्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्यासाठी 6 हजार 580 निवडणूक अधिकारी, कर्मचारी तर शांतता व सुव्यस्था राखण्यासाठी 797 पोलिस अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या मतदारसंघतिं 15 लाख 41 हजार 261 मतदार असून, 22 उमेदवार रिंगणात आहेत.
वर्धा जिल्ह्यातील आर्वी, वर्धा, देवळी आणि हिंगणघाट या चार मतदारसंघांतील 1238 मतदान केंद्रांवर 1410 सीयू मशीन आणि 2820 बीयू मशीन राहणार असून, त्यासाठी 1403 केंद्राध्यक्ष, 1525 मतदान अधिकारी आणि 3652, इतर कर्मचारी राहणार आहेत.