आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabhe Election In Vidarbh Region, Lok Sabha Election Phase 2, Divya Marathi, Akola

लोकशाही मजबूत करण्‍यासाठी मतदार राजाने विदर्भात केले विक्रमी मतदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - विदर्भातील लोकसभेच्या 10 मतदारसंघांत मतदारांनी रणरणत्या उन्हाची पर्वा न करता लोकशाही मजबूत करण्यासाठी गुरुवारी उत्साहाने मतदान केले. जवळपास सर्वच ठिकाणी किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत 62 टक्के झाले. पण, गडचिरोली जिल्हय़ात नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेचे मात्र गालबोट लागले. याव्यतिरिक्त अमरावती येथे मोठय़ा प्रमाणावर मतदारांची नावे यादीत सापडली नसल्यामुळे जिल्हा यंत्रणा आणि युतीचे स्थानिक नेते यांच्यात बराच वाद झाला. इतर ठिकाणीही अशाच किरकोळ तक्रारीही आल्या. लोकसभेच्या 10 मतदारसंघात आज झालेल्या निवडणुकीसाठी एकूण 201 उमेदवार रिंगणात होते. यात 182 पुरूष तर 18 महिला व एकतृतीयपंथी उमेदवाराचा समावेश होता.
यवतमाळात वाढला टक्का
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघांत 60 टक्के मतदान झाले. मतदारसंघांत शांततेत मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. या मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या भावना गवळी, काँग्रेसचे शिवाजीराव मोघे यांच्यात दुहेरी लढत आहे. आप, मनसे यांनीही येथे ताकद आजमावली आहे. वेगळ्या विदर्भाच्या नावावर जांबुवंतराव धोटे यांनी निवडणुकीत आवाज उठवला. या मतदारसंघांत टक्का वाढण्याची शक्यता आहे.
बुलडाण्यात लांब रांगा
सोळाव्या लोकसभेसाठी बुलडाणा लोकसभा मतदारसंघांत सरासरी 58.66 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, यामध्ये काहीशी वाढ होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त करत जिल्हय़ात शांततेत मतदान झाल्याचे स्पष्ट केले. येथील निवडणूक रिंगणातील 17 उमेदवारांचे भाग्य गुरुवारी मतदारांनी यंत्रबंद केले. 15 लाख 91 हजार 496 मतदार असलेल्या बुलडाणा लोकसभेत सायंकाळी 5 पर्यंत आठ लाख 57 हजार 156 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. याउपरही जिल्हय़ातील सहा विधानसभा मतदारसंघांतील ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती. त्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी रात्री उशिरा स्पष्ट होण्याची शक्यता जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केली.
नागपूरात 59 टक्के मतदान : विदर्भातील सर्वात लक्षवेधी लढत असलेल्या नागपुरात मतदारयाद्यांतील घोळ व त्यापायी अनेक ठिकाणी झडलेले वादविवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. नागपूर लोकसभा मतदारसंघांत 59 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
नागपुरात मतदानासाठी सर्वच वर्गांमध्ये उत्साह दिसून आला. अनेक मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदार पोहोचल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. 9 नंतर अनेक मतदार केंद्रांवर रांगा लागायला सुरुवात झाली. नवमतदार तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि महिला अशा सर्वच प्रकारच्या मतदारांमध्ये उत्साह जाणवत होता. मात्र, अनेक मतदान केंद्रांवर मतदानाच्या प्रक्रियेला बराच वेळ लागत होता.
हजारो मतदारांना फटका : अनेक मतदारांची नावे मतदार याद्यांमध्ये नसल्याचे प्रकार या वेळीही गाजले. जवळपास सर्वच वस्त्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर तक्रारी आढळल्या. नाव नसलेले मतदार थेट मतदान केंद्रांवर येऊन वाद घालताना दिसत होते. काही ठिकाणी मतदार याद्या सदोष आढळून आल्या. त्यामुळे निवडणूक अधिकार्‍यांना नेमका निर्णय घ्यायला विलंब होत होता. मतदार याद्यांमध्ये नाव नसल्याचा हजारो मतदारांना फटका बसल्याचे आरोप भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांकडून सुरू होते. जरीपटका, राणी दुर्गावतीनगर, मिनिमातानगरातील काही मतदान केंद्रांवर मतदान सुरू असतानाच मतदान यंत्र बिघडण्याचे प्रकार घडले. अशा केंद्रांवर मतदारांच्या मोठाल्या रांगा लागल्या होत्या.
रामटेकमध्ये 62 टक्के मतदान : मतदार यादीतील घोळ आणि काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या तुरळक घटनांचा अपवाद वगळता रामटेक लोकसभा मतदारसंघांत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 51 टक्के मतदान झाले. एका तासात साधारणत: 5 टक्के मतदान होते. सायंकाळपर्यंत रामटेक लोकसभा क्षेत्रात साधारणपणे 62 टक्के मतदान झाले आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघांतील काँग्रेसचे उमेदवार मुकुल वासनिक व शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आपणच विजयी होण्याचा दावा केला.
गडचिरोलीत 65 टक्के : गडचिरोली-चिमूर मतदारसंघात बुलेट विरुद्ध बॅलेटचा सामना रंगला. या सामन्यात बॅलेटचा नि:संशय विजय झाला असून, पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मतदारसंघांत 65 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गडचिरोली जिल्ह्याचा 95 टक्केभूभाग हा गर्द वनाच्छादित आहे. जिल्ह्यातील बहुतांश जनता आदिवासी आणि निरक्षर आहे. त्यामुळे या भागात माओवाद्यांचे वर्चस्व आहे. लोकशाहीला विरोध असल्यामुळे माओवाद्यांनी जिल्ह्यातील आदिवासी आणि इतर नागरिकांना मतदान न करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी तसे फलक आणि पत्रकेही प्रसिद्ध केली होती. त्यामुळे या मतदारसंघात खरा सामना हा उमेदवारांमध्ये नसून माओवादी आणि प्रशासनात होता. हे आव्हान स्वीकारून गडचिरोली पोलिस आणि निवडणूक प्रशासनाने जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
वर्ध्‍यात 61 टक्के मतदान : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज, दि. 10 रोजी मतदान घेण्यात आले. वर्धा लोकसभा मतदारसंघांमध्ये 1933 मतदान केंद्रांतून पार पडलेल्या या प्रक्रियेत मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पारा 40.5 अंश सेल्सिअस असतानाही मतदारांनी घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला.
या मतदारसंघांतील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये सरासरी 61 टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रियेच्या सुरुवातीला उमेदवार, त्यांच्या प्रतिनिधींपुढे प्रत्येक मतदान केंद्रावर प्रात्यक्षिक घेण्यात आले. वर्धा लोकसभा मतदारसंघांमध्ये रिंगणातील 21 उमेदवारांचे भाग्य आज मशीनबंद झाले. यामध्ये काँग्रेसचे सागर मेघे, भाजपचे रामदास तडस, आपचे अलीम पटेल यांच्यासह अन्य उमेदवारांचा समावेश आहे. अखेरच्या क्षणापर्यंत मतदारांपर्यंत पोहोण्याचा केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा आज मशीनमध्ये बंद झाली. मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांची वाट धरली. नवीन मतदारांसह ज्येष्ठ, महिलांनीही मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला. सकाळच्या पहिल्या टप्प्यात मतदानाची कमी असलेली टक्केवारी प्रत्येक टप्प्यानंतर वाढू लागली.
भंडारा-गोंदियात 65 टक्के मतदान : ऊन्हाची पर्वा न करता मतदार बाहेर पडल्याने भंडारा-गोंदियात 65 टक्के मतदान झाले. सकाळी मतदानकेंद्रांवर शुकशुकाट असला तरी दुपारनंतर गर्दी वाढली. नवमतदार आणि महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया येथे तर नाना पटोले यांनी साकोली तालुक्यातील सुकळी येथे मतदान केले. संवेदनशील भागात चोख बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. जकातदार कन्या विद्यालयातील ईव्हीएम बिघडल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, ही मशीन लगेच बदलून देण्यात आली.
चंद्रपूरात 63 टक्के मतदान : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांत 63 टक्के मतदान झाले. प्राप्त माहितीनुसार येथे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. भद्रावती तालुक्यातील धानोली येथील गावकर्‍यांनी मतदान केंद्र गावापासून दूर असल्याच्या कारणावरून मतदानावर बहिष्कार घातला होता. 850 मतदार गावात असून, त्यांना 9 कि.मी. वर असणार्‍या गावात मतदानाची व्यवस्था होती. याबद्दल गावकर्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
देऊळगावराजात मतदान केंद्रावर तणाव : मतदान संपण्यास अर्धा तास बाकी असताना येथील नगरपालिका मराठी प्राथमिक शाळामधील क्रमांक 4 मधील 24/192 या क्रमांकाच्या मतदान केंद्रावर मतदान करण्यास गेलेल्या एका स्थानीय काँग्रेस नेत्याने बराच वेळ मतदान कक्षात घालवला. यामुळे मतदान केंद्राबाहेर उभ्या असलेल्या भाजप व शिवसेना नेत्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हा काँग्रेस नेता इतर मतदारांच्या नावावर बोगस मतदान करत असल्याच्या संशयाने या मतदान केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला.
अकोल्यात प्रचंड उत्साह
मतदान जनजागृती अभियानांतर्गत अकोला जिल्हा प्रशासनातर्फे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी मतदानासाठी पुढाकार घेतला. अकोल्यात 65 टक्के मतदान झाले. अकोला लोकसभा मतदारसंघांतील 1774 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले असून, भानुदास कांबळे (बसप), संजय धोत्रे (भाजप), हिदायत पटेल (काँग्रेस), अजय हिंगणकर (आप), अँड. प्रकाश आंबेडकर (भारिप-बमसं), शेख हमीद इमाम (बहुजन मुक्ती पार्टी), संदीप वानखडे (अपक्ष) या सात उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले. सकाळी 7 ते सायंकाळच्या 5 वाजेदरम्यान जिल्ह्यातील सहा मतदारसंघांमध्ये 51 टक्के मतदान झाले. कोणत्याही केंद्रावर अनुचित प्रकार घडला नसून, मतदान शांततेत झाले, अशी माहिती जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण शिंदे यांनी दिली.